हिंदुत्व पणाला लावून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सध्या ते मुस्लिमांची बाजू घेऊ लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट गोळ्या घातल्या असत्या, असे वक्तव्य खा. नारायण राणे यांनी कुडाळमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. जिल्ह्यात गेले काही दिवस प्रचाराचा चांगलाच धुरळा उडालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या कोकण दौऱ्यात राणेंवर टीका केली. त्याची परतफेड राणेंनी केली आहे. दरम्यान घराणेशाहीबाबत बोलताना त्यांनी गांधी, पवार, ठाकरे या घराण्यांनी आपल्या घराणेशाहीवर बोलावे. आमच्या विषयी बोलू नये, असा जोरदार हल्लाबोल केला आहे. कुडाळ तालुका भाजपचा कार्यकर्ता मेळावा पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे शुक्रवारी दुपारी संपन्न झाला. यावेळी खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, निरीक्षक जयंत जाधव, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, आ. निरंजन डावखरे, अतुल काळसेकर, राजू राऊळ, आरती पाटील, आनंद मेस्त्री, अशोक सावंत, दिपक नारकर, श्री शेठ आदी उपस्थित होते.
यावेळी खा. राणे म्हणाले की, युद्ध आणि निवडणूक सारखी आहे. जोपर्यंत आपण विजयी होत नाही तोपर्यंत लढत राहिले पाहिजे. सगळ्या प्रकारे आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल. पण शांततेत आणि आपल्या महायुतीने केलेली विकास कामे लोकांपर्यंत घेऊन जाऊन महायुतीला कसे मतदान होईल हे पाहिले पाहिजे. असे सांगून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असले असते तर हिंदुत्व पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या असे सांगून येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे २५ आमदार निवडून येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत जो शिवसेनेचा कार्यकर्ता नावारुपाला आला त्याला संपवण्याचे काम त्यांनी केले. त्याच्याबद्दल बदनामी करणे अपशब्द वापरणे आणि संघटनेतून बालून देणे हे फक्त पैशांसाठी आणि सत्तेसाठी त्यांनी केले. कोकणात एकही प्रकल्प त्यांनी आणला नाही.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे वयोवृद्ध झाले तरी ते तरुण होते त्यांच्या वाणीतून निखारे वाहत होते. त्यांनी कधीही सत्तेसाठी हिंदुत्व गहाण ठेवले नाही असे सांगितले. गेल्या अडीच वर्षात महायुतीन केलेल्या कामावर टीका केली जात आहे पण या सरकारने लोककल्याणकारी व लोकहितवादी योजना आणल्या आहेत. त्या विरोधकांना सहन होत नाही असे त्यांनी सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास, ठेवू नका आणि खासदारकीला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. यावेळी शरद पवार यांच्यावरही टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले. मात्र या काळात त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी ‘आम्हाला शिकवू नये, असे खा. राणे यांनी म्हटले आहे.