कामगार एकजूटीचा विजय असो… अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी प्रलंबीत मागण्यांसाठी निदर्शने केली. संपावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाला अल्टीमेटम दिला असून आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती मधील कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांना मुख्यमंत्र्यांनी सर्व लाभ देण्यास मंजुरी दिलेली आहे. पण तरी देखील काही अधिकारी त्याला हरताळ फासत आहेत. अशा अधिकाऱ्यांनी जाब विचारण्यासाठी रत्नागिरीत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारले.
या आंदोलनसंदर्भात यापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही रत्नागिरी दौऱ्यात येथील कर्मारी संघटनेने निवेदन दिले होते. जिल्ह्यातील सर्व नगरपरीषदा आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी, संवर्ग कर्मचारी कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून या आंदोलनात उतरले होते. शासनाने वेळोवेळी मागण्या मान्य करणे बाबत चाल ढकल केलेली आहे. शासन म्हणजे कोण? आपलेच अधिकारी ज्यांनी सर्व लाभ आपल्या पदरात पाडून घेतलेले आहेत. परंतु त्यांच्याच अधिपत्याखालील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना ते लाभ देण्यासाठी चालढकल करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ते सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. तरी देखील आपलेच अधिकारी त्याला हरताळ फासत आहेत म्हणून अशा
अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता संघटनेने अंतिम पाऊल उचललेले आहे. काम बंद आंदोलन आणि लाँगमार्च काढला तरी देखील अधिकारी प्रशासनावर परिणाम झाला नाही तर संघटनेने ९ ऑगस्ट २०२४ पासून आमरण उपोषणाचा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनांच्यावतीने देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. मोठ्याप्रमाणात कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. नगर परिषदेच्या आवारात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कर्मचारी नेते जितु विचारे, उत्तम पाटील यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले.