नव्याने सुशोभीकरण केलेल्या संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील नामफलकातील दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांतच या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. पंधरा दिवस झाले तरी या नामफलकाची दिव्यांची दुरुस्ती झालेली नाही. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम झाले खरे, परंतु या कामाची देखभाल दुरुस्ती करायची कोणी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण केले. चिपळूण आणि संगमेश्वर येथील रेल्वे स्थानकाची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संगमेश्वर रेल्वे स्थानकाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आले. चिपळूण रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. चिपळूण रेल्वे स्थानकावरील बागेतील वन्य प्राण्यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली आहे.
त्या पुतळ्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केली जाणार आहे, मात्र कोकण रेल्वेने सुशोभीकरण केलेल्या कामाची देखरेख करावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. हे प्रकरण ताजे असताना आता संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील नामफलक नादुरुस्त झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील बाजू मराठी आणि इंग्रजीमध्ये संगमेश्वर रेल्वे स्थानक असे फलक बसवण्यात आला आहे. त्यात एलईडीचे दिवे बसवण्यात आले होते. त्यातील मराठी अक्षरात संगमेश्वर असे लिहलेल्या फलकातील दिवे बंद पडले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी हे दिवे बंद पडले, त्यानंतरही अजून त्याची दुरुस्ती झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम केले आहे. या कामाच्या डीएलपीची मुदत एक वर्ष आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे देवरूख येथील प्रभारी उपअभियंता सुधीर कांबळे यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
सुशोभीकरणातील कामे – रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, रस्त्याकडेला प्रकाश दिवे लावणे, पेव्हड शोल्डर व आरसीसी गटारे बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात स्टेशन प्लाझा, प्रवाशांसाठी स्थानकात बस थांबे बांधणे, स्टेशन प्लाझाअंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करणे, ऊन पावसापासून संरक्षणासाठी कायमस्वरूपी व्यवस्था, प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याकरिता प्रशस्त मार्ग उभारणे अशी कामे केलीत. त्याचबरोबर दुचाकी, चारचाकी, एसटी बस आणि रिक्षासाठी पार्किंगही सुशोभीकरणातून करण्यात आले.