राज्यात अनेक पक्षांमध्ये त्याचप्रमाणे विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेले वादविवाद, आकस जगजाहीर आहे. सेना आणि भाजपचा सुरु असलेला उभा वाद थोड्या थोड्या दिवसाने उफाळून येत असतो. केंद्रीय मंत्री राणे आणि ठाकरे परिवार यामध्ये राणेंनी शिवसेना सोडल्यापासून कायमच शाब्दिक धुमश्चक्री सुरु असल्याचे आपण पहात आहोत. नारायण राणे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आणि नारायण राणेंनी मार्चपर्यंत महाआघाडी सरकार पडेल असं म्हटलं आहे. याआधीही त्यांनी या प्रकारे वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले कि, आमच्याकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला कायमच वादळ येतं. त्यात हलणारी झाडं असतात ती, फांद्यांसकट कोसळून पडतात. हे तीन पक्षांचं एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य खोडावर नाहीत. ते जून महिन्याच्या अगोदर जाणार आहेत.” असं म्हणत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे.
यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, “सामना आणि संजय राऊत याबद्दल काही प्रश्न विचारू नका. त्यांना मी पत्रकार मानत नाही, संपादक तर नाहीच नाही. तुम्ही त्यांची भाषा, वैचारिकता बघा. मागील एका पत्रकारपरिषदेत त्यांनी घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या असा पत्रकार आणि असं सामनात छापून येतं. त्याला बोलायला काही जागा आहे का?” असा टोला लगावला.