रत्नागिरीतील प्रसिद्ध अशी श्री चंडिका देवी गणपतीपुळ्यामध्ये स्थित आहे. सर्वत्र नवरात्र सुरु असल्याने, आणि घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडल्याने, या मंदिरामध्ये सुद्धा पारंपारिक पद्धतीने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवीच्या मंदीरामध्ये गुरुवारी गावचे खोत श्री विजय भिडे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता घटस्थापना करून विधिवत पूजा करून नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
गुरुवारीपासून सर्वत्र नवरात्रोत्सवास सुरवात झाली असून, प्रत्येक ठिकाणी दूर्गादेवीची मूर्ती आणून, नऊ दिवस तिची पूजा अर्चा करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मात्र गणपतीपुळे येथील मंदिरामध्ये मात्र वेगळीच प्रथा आहे. या ठिकाणी दूर्गादेवीची पार्थिव मूर्ती न आणता फक्त घटस्थापना करून उत्सवाला सुरुवात होते आणि उत्साहात तो साजराही केला जातो.
या वर्षी कोरोनाचे संकट डोक्यावर घोंघावत असल्याने या मंदीरामध्ये पोलीस स्थानकामधून मिळालेल्या सर्व कोरोना नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सव कालावधीमध्ये दररोज वेगवेगळ्या यजमानांना देवीच्या विधिवत पूजा करण्याची संधी मिळते. देवीच्या आरतीसाठी सायंकाळी ७ वा. जास्त प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित राहतात.
हा उत्सव कोरोनामुळे गेले दोन वर्षे चंडिका मंदीरामध्ये पंचकमिटी यांनीच साजरा केलेला. मात्र यंदाच्या वर्षी या उत्सवाला निर्बंध शिथिल करण्यात आल्याने, काही प्रमाणात परवानगी मिळाली असल्याने सध्या मंदीरामध्ये थोड्या फार प्रमाणात का होईना पण भक्तांची मांदियाळी दिसू लागली आली. गुरुवारपासून या नवरात्रोत्सवास सुरवात झाली असून दररोज विविध आरती, कीर्तन तसेच लहान मुलांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.
पोलीस स्थानकामधून दांडिया आणि गरबा नृत्यास परवानगी मिळाली नसल्याने असंख्य दांडिया प्रेमींचा निरुत्साह असल्याचे समजते आहे. तसेच पोलीस स्थानकामधून आधीच कळविण्यात आलेले आहे कि, गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे दांडिया खेळल्यास त्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.