हरचिरी-बौद्धवाडी येथील डोंगर खचण्याची भीती निर्माण झाल्याने १० कुटुंबे सध्या भीतीच्या छायेखाली आली आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने प्रशासनाने देखील गंभीर दखल घेत त्या १० कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा महसूल विभागमार्फत बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तालुक्यातील हरचिरी बौद्धवाडी परिसरात २०१९ पासून डोंगर खचण्यास सुरूवात झाली. जमिनींना ३ ते ४ फुटांच्या भेगा पडू लागल्याने संपूर्ण वाडी डेंजर झोनमध्ये आली होती. गतवर्षी खचणाऱ्या डोंगराचे सर्वेक्षण पुणे येथील भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करण्यात आले. त्यांनी आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केला आहे.
भीतीचा गोळा – नुकतीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे डोंगर खचून मोठी आपत्ती ओढवली. तब्बल १७ जणांचा जीव या आपत्तीत गेला आहे. इर्शाळवाडी येथे डोंगर खचल्यानंतर हरचिरी-बौद्धवाडी येथील रहिवाशांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला आहे.
अतिवृष्टी झाल्यास भूस्खलन – येथील ग्रामस्थांनी खचणाऱ्या डोंगराबाबत वारंवार प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आता तर अतिवृष्टीची भीती असून अतिवृष्टी झाल्यास पुन्हा भूस्खलन होईल अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रात्र जागून काढण्याची वेळ येथील ग्राम स्थांवर आली असल्याचे काही ग्राम स्थांनी सांगितले.
७० ते ८० घरे – हरचिरी-बौद्धवाडी येथे एकूण ७० ते ८० घरे असून त्यातील १० घरे डोंगरानजीक आहेत. यातील काही घरांना तडे गेले असून १० कुटुंबे सध्या भीतीच्या छायेखाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या कुटुंबांना स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा बजावल्या जातात. मात्र आता जुलै महिना संपायला ८ दिवस उरलेले असताना अद्यापही अशा कोणत्याही नोटीसा या कुटंबांना प्रशासनाने दिलेल्या नाहीत.
डोंगरच उतरलाय ? – काही ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले की २०१९ पासून हरचिरी बौद्धवाडी परिसरात डोंगर खचायला सुरूवात झाली. जमिनींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. परिस्थिती जैसे थे असून डोंगर कधीही खाली 7 येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पुनर्वसन करा – येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशसानाकडे पुनवर्सनाची मागणी केली आहे. आमचे पुनर्वसन करता येत नसेल तर आमच्या जमिनी शासनाने खरेदी कराव्यात व त्याचा मोबदला आम्हाला द्यावा. आम्ही दुसऱ्या ठिकाणी घरे बांधतो, अशी मागणीदेखील काही ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, याबाबत हरचिरीच्या तलाठ्यांकडे संपर्क केला असता १० कुटुबांना स्थलांतर होण्याच्या नोटीसा बजाण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती तलाठी नाईक यांनी दिली. स्थलांतरीत होणाऱ्या कुटूंबांची व्यवस्था येथील मराठी शाळेत केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.