कोरोना काळापासून कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव अवयवांची तस्करी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या तस्करी मोठ्या प्रमाणात घडून आल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात वन्यजीव तस्करांची मोठी साखळी सक्रीय असल्याचे समोर आले आहे. वन्यजीवांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्यांची होणारी शिकार खंडित करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या लोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे शिकार आणि तस्करीचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. मात्र ही चळवळ व्यापक पद्धतीने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरेनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, वन्यजीव तस्करी ही जागतिक स्तरावर डोकेदुखी झाली असून, त्यावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात पुरेसे यश आलेले नाही. काळी जादू, अंधश्रद्धा, शौक, औषधी यांच्या वापरासाठी वन्यजीवांचे नाहक प्राण घेतले जातात. बिबट्याची नखे, कातडी, दात, खवले मांजरचे खवले, नखे, व्हेलची उलटी, साळिंदराचे काटे, मोराचे पंख, घुबडाचे पंख, नखे, कासवांचे कवच नखे, घारीची नखे, मगरच्या कातड्यांची तस्करी केली जाते. पोलिस, वन विभाग आणि प्राणी मित्रांच्या सर्तकतेमुळे वेळोवेळी तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.
कोकणातून खवले मांजराची तस्करी करण्याचा प्रकार मागील काही वर्षापासून सातत्याने घडत आहे. खवल्या मांजरांची सातत्याने होणारी शिकार आणि तस्करी उघड झाल्या नंतर सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने खवले मांजराची शिकार होऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
पूर्वी खवले मांजराची तस्करी, लोक पैशासाठी करायचे. मात्र अलीकडच्या काळात आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. हा प्राणी दिसला तर त्याला जंगलात सोडा. त्याला मारू नका, त्याचे महत्त्व काय आहे हे लोकांना आम्ही पटवून देऊ लागलो. त्याशिवाय कोणी शिकारी किंवा तस्करी आला तर त्याची माहिती पोलिस, वन विभागाला द्या असे आम्ही लोकांना सांगू लागलो. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.