कोकण रेल्वे मार्गावर, अनेक गाड्या धावत असतात. पण सगळ्याच गाड्यांना सर्वच स्थानकांवर थांबा मिळत नाही. बर्याचशा सुपरफास्ट एक्स्प्रेस रत्नागिरी पर्यंतच्या काही ठराविक ३ ते ४ स्थानकांवर थांबून पुढे मार्गस्त होतात. त्यामुळे बऱ्याच स्थानकातील प्रवाशांना पुढील गाडीसाठी ताटकळत राहावे लागते.
नेत्रावती आणि मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाडयांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने आयोजित केलेल्या बेमुदत उपोषणाला सर्व स्तरातून प्रतिसाद अधिकच मिळत आहे. कोकण रेल्वे प्रत्येक वेळी संगमेश्वर स्थानकासाठी तिकीट आरक्षण संख्या कमी असल्याचा दावा करत आहे. या स्थानकात एकूण अप-डाऊन अशा दहा गाड्या थांबतात. पण यातील काही गाड्याचे येण्याची वेळ रात्री अपरात्री असल्याने प्रवाशांना आपल्या गावात जाण्या-येण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि या वेळा गैरसोयीच्या ठरतात.
निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण या फेसबुक ग्रुपतर्फे प्रमुख पत्रकार संदेश झिमण आणि सहकारी यांनी २६ जानेवारी २०२२ रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून बेमुदत उपोषण करणार आहेत. या सनदशीर आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे व तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन्ही गाड्या दिवसा उजेडी येत असल्याने त्या प्रवाशांना सोयीच्या ठरत असून, इतर येणाऱ्या गाड्या या उशिरा येत असल्याने नाहक मन:स्ताप आणि आर्थिक भुर्दंडामुळे शेकडो प्रवासी वैतागले आहेत. त्यामुळे तमाम संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने हे बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुक समूह प्रमुख पत्रकार संदेश झिमण यांनी दिली आहे.
उपोषणाच्या ठिकाणी शासनाने आखलेले सर्व कोविड संदर्भातील निर्बंधाचे पालन केले जाईल, पण त्या दिवशी उपोषणाला काही गाल बोट लागले आणि कोरोनाचे संक्रमण वाढल्यास त्याला निव्वळ कोकण रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा संदेश झिमण यांनी दिला आहे व तशी कल्पना या आधीच कोकण रेल्वे प्रशासन आणि सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांना २६ जानेवारीच्या उपोषणच्या पत्रात लेखी स्वरूपात कळवली असल्याचे त्यांनी सांगितले.