महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड आणि लगतच्या रायगड जिल्हयाचे विभाजन करून महाड हा नवीन जिल्हा स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. अर्थात हा प्रस्ताव जुना असून त्याची अंमलबजावणी कधीपासून होते याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल तसेच स्थानिक पातळीवर विकासाच्या प्रक्रिया गतिमान होतील, असा सरकारचा विश्वास आहे.
नव्या जिल्ह्यांची यादी – प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (नवीन जिल्ह्याचे नाव आणि त्यापुढील कंसामध्ये ज्या मूळ जिल्ह्याचे विभाजन करून हा नवीन जिल्हा स्थापन होणार आहे त्याचे नाव आहे.) – भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), अंबेजोगाई (बीड), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), किनवट (नांदेड), मीरा-भाईंदर (ठाणे), कल्याण (ठाणे), माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर), ‘खाम गाव (बुलडाणा), बारामती (पुणे), पुसद (यवतमाळ), जव्हार (पालघर), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), मंडणगड (रत्नागिरी), महाड (रायगड), शिर्डी (अहमदनगर), संगमनेर (अहमदनगर), श्रीरामपूर (अहमदनगर), अहेरी (गडचिरोली)
प्रस्तावाचा इतिहास – महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी फक्त २५ जिल्हे अस्तित्वात होते. कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने २२ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता त्यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याचे दिसते. नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील, तसेच नागरी सुविधांमध्ये वाढ होईल. येत्या काही वर्षांत या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.