नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम जिल्ह्यात शांततेच्या दृष्टीने जे-जे प्रयत्न करता येतील आणि जिल्हा प्रगतीपथावर कसा राहील यासाठी प्रयत्नशील राहणार असण्याचे प्रतिपादन केले आहे. यापूर्वीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सुरू केलेले उपक्रम आपण पुढे चालू ठेऊ, सोबतच आणखी नवीन विकसनशील उपक्रम सुरू करू, अशी ग्वाही दिली.
धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ जिल्हा पदभार स्वीकारला. या वेळी मावळते पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. या वेळी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोकण अतिशय निसर्गसुंदर आहे. त्यामुळे कोकणात येण्यास मी फारच उत्सुक होतो. इथले निसर्ग सौंदर्य, प्रेमळ माणसं, कोकणातील लोकांची विशेष आदरातिथ्य करण्याची पद्धत हे सर्व मला ज्ञात होते. त्यामुळे निश्चितच रत्नागिरीचा पदभार सांभाळताना मला खूप आनंद वाटला.
प्रथमत: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना मी भेटी देणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शांतता समिती आणि अन्य समित्यांच्या सदस्यांसोबत संवाद साधणार आहे. सर्व समावेशक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी दिली. मी मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी काम केले आहे. त्यामुळे तो अधिकचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्याचा मला येथे काम करताना नक्कीच फायदा होईल. यापूर्वीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद फोफावलेल्या भागामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदकाने गौरवण्यात आले होते. शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेतील कार्याबद्दल युनो ने शांतता पदकाने त्यांचा गौरव केला होता. ‘पोलिसशास्त्र’ या विषयावरील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्येही ते सहभागी आहेत. त्यांच्या या एकूण कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आले असून त्यांची दलातील कारकिर्द उज्ज्वल आहे.