मागील महिन्यापासून सारखे चर्चेत असणारे सिंधुदुर्ग बँक निवडणूक प्रकरण अजूनही गाजतच आहे. शिवसैनिक संतोष परब खुनी हल्लाप्रकरणी संशयित म्हणून आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. जिल्हा न्याय्यालायातून सुद्धा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने अखेर नितेश राणे न्यायालयाच्या आदेशानुसार वरील कोर्टात अपील न करता शरण आले.
पण त्या हल्ला प्रकरणावरून आमदार नितेश राणे यांच्या अडचणीमध्ये अजूनच वाढ होताना दिसत आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी त्यांना पोलिसांनी गुरुवारी गोव्यात नेऊन या गुन्ह्याच्या कटाबाबत चौकशी केली. दीड महिने कायदेविषयक लढा दिल्यानंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आले. कणकवली येथील न्यायालयाने त्यांना आज ४ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पोलीस तातडीने कसून तपासाच्या कामाला लागले आहेत.
आम. नितेश राणेंना अटक झाल्यावर, सावंतवाडी येथे परिस्थिती संपूर्ण खवळली होती. ती नियंत्रणाबाहेर जायच्या आधी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्रीच कणकवलीहून सावंतवाडी पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास राणे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतचा तपशील मिळू शकला नाही. या हल्लाप्रकरणी त्यांच्यावर कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.