पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याचे वेगवेगळे प्रकार घडत असतात. पावसामध्ये हे प्रमाण जास्तच घडत असल्याने त्यावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये डोंगराचा यु शेपचा आकार बदलत व्ही शेपचा आकार देण्यात येऊन डोंगरामध्ये मातीच्या पायऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अति वृष्टीमुळे डोंगर खचून, किंवा मोठमोठे दगड रुळावर येण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
प्रत्येक पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेला अनेक अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. परंतु, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्ही आकाराचा वापर करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्याने कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचे प्रमाण कमी झाले असून पावसाळ्यामध्येही रेल्वे प्रवास करणे सुखकर होऊ शकतो.
कोकण रेल्वेमुळे अनेक मोठी शहरे लहान शहरांना जोडली गेलीत. रेल्वेच्या संख्येमध्ये सुद्धा आता लक्षणीय वाढ झाल्याने पर्यटकांची संख्या वाढून रेल्वेच्या उत्पन्नामध्येही वाढ होत आहे. त्यामुळे अद्ययावत यंत्रप्रणालीचा वापर करून कोकण रेल्वेचा प्रवास जास्तीत जास्त सुखकर करण्याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष आहे.
रत्नागिरीमधील निवसर येथे कायम जमीन खचणे, रुळावर पाणी साठून राहणे हा दरवर्षीचा त्रास आहे. पण आता त्यामध्ये बदल करून, जुना मार्ग बदलून तिथे नवीन रूळ टाकण्यात आले आहेत. मागील गेल्या १२ वर्षापासून, ३५० कोटी रुपये खर्च करत अनेक धोकादायक ठरणाऱ्या भागांची डागडुजी केली गेली आहे. पोमेंडी येथील रेल्वे मार्गालगत असलेला यु आकारातील डोंगराचा आकार बदलून त्याला व्ही आकारामध्ये बदलण्यात आले आहे. तसेच डोंगरावरील येणारे पाणी न साठता वाहून जाण्यासाठी गटारे बांधण्यात आली आहेत. कातळ भागातील अशा धोकादायक भागांना लोखंडी जाळी लावण्याची कामे परिपूर्ण झाल्याने रेल्वे प्रवास विनात्रास पूर्ण होऊ शकतो.