छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेले असताना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चानं संताप व्यक्त केला आहे. मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
संभाजीराजे भोसले तुळजापूरला तुळजा भवानीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. संभाजीराजे देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जात असताना नियम सांगून त्यांना रोखण्यात आलं. यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. या घटनेवेळी मंदिरातून बाहेर पडताना संभाजीराजे भोसले यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
याबद्दल मराठा क्रांती ठोक मोर्चानं तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवलं आहे. ‘संभाजीराजे भोसले तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असता कुठलाही प्रोटोकॉल न पाळता त्यांना दर्शन घेण्यासाठी सहजनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी गाभाऱ्यात येण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांचा अवमान केल्याने छत्रपती प्रेमींचं मन दुखावलं आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं. अन्यथा दप्तर दिरंगाई कायद्यानुसार वाट पाहून बोंब मारो आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा मोर्चाकडून देण्यात आला आहे.
तुळजाभवानी ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आहे. तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर देखील छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा, परंपरा आजही इथे पाळल्या जातात. भाविकांना गाभाऱ्यात जाण्यास बंदी असली तरी हा नियम छत्रपती घराण्याला लागू होत नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, अशी परंपरा आहे. तहीरी हा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता मंदिर मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. यामुळे हा वाद जवळपास संपुष्टात आला आहे.