28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeSportsसौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान

सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान

पाकला हरवणारा मुंबईकर नेत्रावळकर ठरला अमेरिकेचा हिरो.

कमालीच्या रंगतदार झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभूत करून अमेरिका संघातून खेळणारा मुंबईचा मराठमोळा सौरभ नेत्रावळकर हिरो ठरला. द्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आता त्याच्यासमोर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे आव्हान असणार आहे. अमेरिकेच्या या विजयामुळे ‘अ’ गटात पाकिस्तान संघाचे धाबे दणाणले आहेत. रविवारी भारताविरुद्धचा सामना त्यांनी गमावला, तर त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येऊ शकते. अमेरिकेने दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह आघाडी घेतली आहे. भारत-अमेरिका हा साखळी सामना १२ जून रोजी होणार आहे.

…तर सुटी वाढवावी लागणार – सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेत संगणक अभियांत्रिकीची मास्टर्स ही पदवी मिळवली. आता तो तेथे ऑर्कल या प्रसिद्ध कंपनीत मुख्य अभियंता म्हणून नोकरीस आहे. या विश्वकरंडक स्पर्धेसाठी साखळी सामन्यापर्यंत म्हणजेच १७ जूनपर्यंत सुटी काढलेली आहे; परंतु अमेरिकेचा संघ सुपर- ८ साठी पात्र ठरण्याची शक्यता आहे, परिणामी सौरभला सुटी वाढवावी लागणार आहे. युवराजच्याही यष्टी उखडल्या होत्या. सौरभ २००९ मध्ये बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होता. एअर इंडियाकडून त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे कॉर्पोरेट स्पर्धेत खेळताना त्याने एका सामन्यात युवराज सिंगच्या यष्टी उखडल्या होत्या.

या स्पर्धेनिमित्ताने त्याला युवराज, सुरेश रैना, रॉबीन उथप्पा यांच्यासह ड्रेसिंग रूममध्ये राहता आले. त्यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी प्रतिस्पर्धी होते. आता त्याच विराटचा सामना त्याला १२ जून रोजी करायचा आहे. सौरभ नेत्रावळकरला २०१३ मध्ये मुंबईकडून रणजी पदार्पण करण्याची संधी मिळाली, पण काही महिन्यांत त्याला संगणक अभियंत्याची नोकरी मिळाली. पुण्यात काही महिने हंगामी नोकरी केल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.

सौरभने केली परतफेड – सुपरओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणाऱ्या सौरभ नेत्रावळकरने १४ वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न पूर्ण केले. २०१० मधील १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट सर्धेत भारताचा सामना पाकविरुद्ध झाला होता, त्यात सौरभने चांगली गोलंदाजी केली होती; परंतु भारताचा पराभव झाला होता. पाक संघातून त्यावेळी बाबर आझम खेळत होता. आता बाबर आझम कर्णधार असलेल्या पाक संघाला सुपरओव्हरमध्ये हरवून सौरभने त्या पराभवाची परतफेड केली. सुपरओव्हरमध्ये अमेरिकेने १८ धावा फटकावल्या, यावेळी पाककडून गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद आमेरने तीन वाईड चेंडू टाकले, यावर एकूण ७ धावा फटकावण्यात आल्या; तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने गोलंदाजी केली आणि त्याने एका विकेटसह १३ धावाच दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular