अरे बापरे! चक्क अॅम्ब्युलन्समधून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी

435
whale fish and vomit

रुग्णवाहिकेतून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या रत्नागिरीतील चार संशयित आरोपींना सातारा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. रत्नागिरीतीलच एका रुग्णवाहिकेतून परटवणे येथून व्हेल माशाची उलटी तस्करीसाठी नेण्यात आली होती. तब्बल साडेपाच कोटींची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे पुढे आल्याची चर्चा सुरू झाली आहे.व्हेल माशाच्या उलटीला करोडोंचा भाव मिळत असल्याने व्हेल माशाची उलटी मिळवण्यासाठी सारेजण दिवसरात्र एक करीत असतात. यापूर्वी व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या रत्नागिरीतील पोलिसांनी आवळल्या होत्या. रत्नागिरीत डाळ शिजत नसल्याने आता पश्चिम महाराष्ट्राकडे तस्करांनी आपला मोर्चा वळवला आहे.

रुग्णवाहिकेचा वापर – याआधीही सांगलीमध्ये तब्बल पावणे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी सापडली होती. आता व्हेल माशाच्या उलटीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून त्याच्यांकडून साडेपाच कोटींची उलटी जप्त केली आहे.

चौघांना अटक – फ्लोटिंग गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करीच्या आरोपाखाली चौघांना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या व्हेल माशाचा उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी ४३ लाख एवढी किंमत असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी या उलाटीच्या वाहतुकीसाठी अॅम्बुलन्सचा वापर करत होते. पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली आहे.

तरंगणारे सोने, कोट्यवधींचा ऐवज – व्हेल माशाची उलटी किंवा अंबरग्रीस तुमच्या खिशात छिद्र पाडू शकते. एका किलोग्रॅम व्हेल माशाच्या उलटीची किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अंबरग्रीसला समुद्राचा खजिना आणि तरंगणारे सोने असेही म्हटले जाते. हे अत्यंत मौल्यवान असून त्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे. अंबरग्रीसचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो. तसेच हे कामोत्तेजक मानले जाते आणि त्याचा काही औषधांमध्येही वापर केला जातो. दरम्यान, भारतात, अंबरग्रीस विक्री कायद्याद्वारे प्रतिबंधित आहे कारण व्हेल ही धोक्यात असलेली प्रजाती आहे. तसेच व्हेल मासा ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहे. १९७० मध्ये व्हेलला लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले होते.

विक्री करण्यासाठी आले – सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील एका शोरुमच्या समोर चारजण व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अॅम्ब्युलन्समधून चारही आरोपी तिथे आले. पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये आरोपींकडे व्हेल माशाची उलटी आढळून आली आहे.

गुन्हा दाखल – या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी ४३ लाख एवढी असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी म्हणून सिध्दार्थ विठ्ठल लाकडे, अनिस इसा शेख, नासिर अहमद रहिमान राऊत, किरण गोविंद भाटकर यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. या संशयित आरोपींवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रुग्ण न्यायचा आहे – व्हेल माशाच्या उलटीसाठी ज्या रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला त्या रुग्णवाहिका मालकाला रुग्ण घेऊन जायचे आहे असे सांगण्यात आले. सातारा येथे रुग्ण न्यायचा असल्याने रत्नागिरीतील एका मालकाने आपली रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली होती.

रुग्णवाहिका चोरीला गेल्याचा संशय – ज्या मालकाची रुग्णवाहिका होती ती पुन्हा रत्नागिरीत न आल्याने रुग्णवाहिका मालकाला रुखरुख लागली होती. एक दिवस गेला रुग्णवाहिका काही आली नाही. आपली रुग्णवाहिका चोरीला गेली असावी असा कयास लावून रुग्णवाहिका मालक शहर पोलिस स्थानकात तक्रार अर्ज घेऊन गेला होता. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर सारा प्रकार त्याच्या कानावर पडला आणि त्याला धक्काच बसला.

परटवण्यावर उलटी घेऊन आले – मिळालेल्या माहितीनुसार व्हेल माशाच्या तस्करीचा प्लॅन हा पूर्व नियोजित होता. कोणी कुठे येऊन भेटायचे याची कल्पना सर्वांना देण्यात आली होती. त्यानुसार काहीजण व्हेल माशाची उलटी घेऊन रत्नागिरीतील परटवणे चार रस्त्यावर पहाटेच्या सुमारास आले होते.

साताऱ्याकडे रवाना – रत्नागिरीतील परटवणे येथून चौघेजण रुग्णवाहिकेतून साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले. रुग्णवाहिका चालकालायाची पुसटशी कल्पनादेखील  नव्हती. रुग्णवाहिका कुणी थांबवण नाही याची खात्री असल्याने आपली तस्करी यशस्वी होईल असा अंदाज आरोपींनी बांधला होता.

टीप मिळाली – व्हेलमाशाच्या उलटीचा सौदा ठरला होता. किंमत ठरत होती. ज्याठिकाणी हा व्यबहार सुरु होता. त्याठिकाणी पैशाची बोलाचाली सुरु होती. मात्र याचा सुगावा आधीच साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागला होता. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. सारेजण पोलिसांच्या जाळ्यात आपोआप अडकले.