दुबई ते बंगळूर जाणाऱ्या एमटीपार्थ हे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबरला विजयदुर्ग ते देवगड समुद्रात ४० ते ४५ वाव अंतरावर बुडाले. रत्नागिरी कोस्ट गार्डच्या अहवालानुसार साधारण दोन ते तों दिवसानंतर जहाजातून तेल गळती व्हायला सुरूवात होईल. परिणामी १९ सप्टेंबर पासून तेलाचा तवंग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील समुद्रात पसरू लागला आहे. एमटीपार्थ १०१ मीटर लांबीच्या जहाजा वरील १९ खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात कोस्ट गार्डला यश मिळाले आहे, तरीही पार्थ जहाजाच्या अपघातानंतर होणाऱ्या तेल गळतीमुळे सागरी जीविताना मोठा धोका निर्माण झाला आहे.
जहाजाच्या बंकर्समध्ये १४० टन इंधन तेल, तर ३० टन डिझेल इतका साठा होता. त्याचा समुद्रात हळूहळू विसर्ग होऊ लागला आहे. जहाज बुडालेल्या ठिकाणापासून आठ चौरस किलोमीटर परिसरात तवंग पसरला होता; मात्र आता विजयदुर्ग ते मालवण किनारपट्टीपर्यंत तवंग पोहोचला आहे. हळूहळू वेंगुर्ले किनारपट्टीपासून गोव्याच्या किनारपट्टीवर तवंग पसरेल, अशी शक्यता गोव्यातील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी व्यक्त केली आहे. जहाजातील तेल विसर्ग २० सप्टेंबरपासून जास्त प्रमाणात होऊ लागल्याने तवंगसुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणात किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागल्याने जिल्ह्याच्या पूर्ण किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे.
बुडालेल्या एमटी पार्थ या तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याने जिल्ह्यातील जैव वनस्पतींवर देखील त्याचा दुष्परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील समुद्रातील जैवसृष्टीला धोका निर्माण होऊन मत्स्य उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. पर्यटनदृष्ट्या देखील नुकसान होण्याचे संकेत दिसून येत आहेत. किल्ले सिंधुदुर्गजवळ असलेल्या प्रवाळ, तसेच जिल्ह्यातील कांदळवन, डॉल्फिन, समुद्रातील मासे, समुद्री पक्षी यांच्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. पांढरेशुभ्र असलेले किनारे डागाळून काळे पडण्याची शक्यता आहे.