राज्य सरकारने हिंदीची सक्ती करणारा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासह तमाम मराठीप्रेमी माणसांनी गेल्या आठवड्यात विजयी मिरवणूक काढली होती. या दरम्यान मीरारोड येथे परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार देत उर्मट उत्तरे दिली. त्यामुळे चिडलेल्या मंडळींनी या व्यापाऱ्याला चौदावे रत्न दाखवत ‘भरपेट प्रसाद’ दिला होता. त्याचा निषेध म्हणून ३ जुलै रोज़ी मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारून मोर्चा काढला आणि मराठी भाषिकांना डिवचले होते. या विरोधात ८ जुलै रोजी मराठी एकीकरण समितीने विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने त्याला स्वाभाविकपणे पाठींबा दर्शविला. अन्य काही पक्ष आणि संघटनांनीदेखील पाठींबा जाहीर केला होता. कोणत्याही राजकीय झेंड्याखाली हा मोर्चा निघणार नाही, तर मराठी एकीकरण समितीच्या बॅनरखाली ८ जुलैला मोर्चा निघेल असे जाहीर करण्यात आले होते.
परवानगी नाकारली – मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि वादाची ठिणगी पडली. मोर्चाचा मार्ग बदला, असा पोलिसांचा हेका होता. मात्र तो मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांनी फेटाळला. मीरारोडमधील बालाजी पार्क ते मीरारोड स्टेशन असा मार्ग मोर्चासाठी जाहीर करण्यात आला होता. मात्र पोलिस त्यांना परवानगी देत नव्हते. बालाजी पार्क असो किंवा मीरा रोड स्टेशन परिसर असो दोन्ही ठिकाणी आधीच गर्दी असते, त्यामुळे या मार्गावरून मोर्चा नेल्यास काही अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे या मार्गावरून मोर्चा न्यावा, असे पोलिसांचे म्हणणे होते. ते महाराष्ट्र एकीकरण समितीने मान्य न केल्याने पोलिसांनी परिसरात जमावबंदी जाहीर केली.
नेत्यांची धरपकड – पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्विकारल्याचा आरोप मोर्चाच्या आयोजकांनी केला आहे. कारण मंगळवारी सकाळी १० वा. मोर्चा निघणार हे जाहीर झाल्यानंतर सोमवारी उत्तररात्रीनंतर पोलिसांनी मनसे आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पहाटे ३ वा. ताब्यात घेण्यात आले. शिवसेना आणि मनसेच्या अन्य काही नेत्यांनाही प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले होते.
लोक एकवटली – मंगळवारी संपूर्ण मीरा भाईंदरसह ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वा. मोर्चा सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच बालाजीचौक परिसरात मराठी माणूस येवू लागला. पाहता पाहता गर्दी वाढत गेली. पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगत अडविण्याचा कार्यक्रम सुरू केला. मात्र त्यामुळे नेतेमंडळी खवळली. ३ जुलैला जो व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, तो येथूनच निघाला, त्यांना तुम्ही परवानगी दिलीत आणि आम्हांला का नाही? आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत, असे मनसेच्या काही स्थानिक नेत्यांनी सांगितले.
अडीच तास राडा – मात्र पोलिस मार्ग बदलण्याच्या आपल्या आग्रहावरं ठाम होते. त्यामुळे एकीकरण समितीचे स्थानिक नेते आणि पोलिस यांच्यात वाद सुरू होता. तेवढ्यात मनसेचे नेते संदीप देशपांडे हे लोकलने मीरारोडमध्ये पोहोचले. अभिजीत पानसे, माजी आ. नितीन सरदेसाई ही मंडळीदेखील आली. शिवसेना उबाठाचे नेते माजी खा. राजन विचारे यांच्यासह शिवसेनेचे अन्य काही नेते पोहोचले. या सर्वांसोबत पोलिसांनी चर्चा केली. मात्र मार्ग बदलण्यास नकार देण्यात आला. जवळपास अडीच तास या विषयावर राडा सुरू होता. इकडे मोर्चात सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे येणाऱ्या मराठी माणसांची गर्दी वाढत होती. बस, रिक्षा, टू व्हिलर, कार, टेम्पो, ट्रक, बेस्टची बस आणि लोकल आदी मिळेल त्या वाहनांतून लोकं आली.
अखेर प्रशासन झुकले – हा वाद सुरूच होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आदी नेत्यांसह याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्यात आला. लोकं संतापली होती.
कोणत्याही क्षणी त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो आणि त्यातून अनुचित प्रकार घडल्यास प्रकरण हाताबाहेर जाईल, ही स्थिती ओळखून पोलिसांनी अखेर माघार घेत मोर्चाला परवानगी दिली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट पोलिस महासंचालकांशी संपर्क साधून परवानगी का नाकारण्यात आली? असा सवाल करत जाणूनबुजून वातावरण तापवण्याचा कुणाचा प्रयत्न तर नाही ना? याचा शोध घ्या, असे आदेश दिले. गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पोलिसांच्या संपर्कात होते. अखेर नियोजित मार्गावरून मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली.
जोरदार घोषणाबाजी – या साऱ्या गदारोळामुळे सकाळी १० वा. सुरू होणारा मोर्चा दुपारी १२.३० वा. च्या सुमारास बालाजी पार्क येथून सुरू झाला. हजारोंच्या संख्येने मराठी लोकं या मोर्चात सहभागी झाले होते. ‘मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, हमसें जो टकराएगा, मिट्टी मे मिल जाएगा, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणला. ‘मिरा भाईंदर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशीही घोषणा देण्यात आली.
मोर्चात महिलांचा सहभाग – या मोर्चात हजारों लोकं उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. प्रशासन आणि परप्रांतीयांच्या मुजोरी आणि दडपशाही विरोधात निघालेल्या या मोर्चात संताप व्यक्त होत होता. इथे राहायचं तर मराठी बोलावंच लागेल, असे मोर्चात सहभागी झालेले नेते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगत होते. मोर्चा मीरारोड स्थानक परिसरात आगमन होताच घोषणाबाजीला उधाण आले. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
जाधव यांचे स्वागत – त्याचवेळी पोलिसांनी ज्यांना पहाटे पकडले होते, ते मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडल्यामुळे मीरारोड स्टेशन येथे ते दाखल झाले. ते येताच मोर्चात सहभागी झालेल्या मराठी जनतेने जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यानंतर अभिजीत पानसे, माजी खा. राजन विचारे, माजी आ. नितीन सरदेसाई आदी नेत्यांनी भाषणे केली आणि त्यानंतर हा मोर्चा विसर्जित झाला.