पुण्यातील शीतल महाजन हिने स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिन असा दुहेरी संगम विचारात घेऊन हडपसर येथील ग्लायिडग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने पाच हजार फुटांवरून नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्प केले आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राची आन बान आणि शान नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली असून, हा तिचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाला आहे.
या अनुभवाबद्दल शीतल महाजन यांना विचारले असता त्या म्हणाल्या कि, आतापर्यंत मी साडी नेसून भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायिव्हग केले आहे परंतु, जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजम्प केल्याने ही विशेष पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळय़ा स्पर्धामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. आतापर्यंत माझ्या नावावर एकूण १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रमांची नोंद आहे. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी माझा सबिहा गोकसेन सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शीतल महाजन, साडी नेसून डायव्हिंग करणारी भारताची पहिली महिला स्कायडायव्हर आहे. देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शीतल महाजन पुण्यात साडी नेसून स्कायडायव्हिंग करायला गेल्या, यावेळी उपस्थित लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
स्कायडायव्हिंगसाठी प्रसिद्ध शीतल महाजन यांनी २०१८ मध्येच भारताची पहिली महिला स्काय डायव्हर होण्याचा मान मिळविला असला तरी २०२२ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा या निमित्ताने साडी नेसून केलेले शीतल महाजनचे स्काय डायव्हिंग महिलांना नक्कीच प्रेरणा देईल.