कोरोनामुळे साधारण दीड वर्ष शाळा प्रत्यक्ष सुरु केली गेली नाही. सर्व शिक्षण पद्धती ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाते. सध्या ज्या गावामध्ये कोरोनाबाधित एकही रुग्ण संख्या नसेल अशा ठिकाणी अशा गावामध्ये येत्या दि. १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोना नसलेल्या गावातील शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी पालकांशी चर्चा करून ठराव करण्याचे सूचित केले आहे. मात्र, पालकच साशंक अवस्थेत असल्याने जिल्ह्यातील एकाही शाळेने अजून ठराव केलेला नसला तरी पालकांकडून सूचना मात्र मागविण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीमधील अनेक शाळांमधून पालकांना ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरण्यासाठी दिला जात आहे. ज्याची पूर्तता १३ जुलै पर्यंत करण्यास सांगितली गेली आहे. नववी,दहावी,अकरावी आणि बारावी हा विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा पाया असल्याने, या वर्गातील मुलांना नियमित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आज अनेक गावा, शाळांमध्ये इंटरनेटची उपलब्धता नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रित्या कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. पण शासनाने पालक आणि शाळा यांच्या कडून जर ग्रीन सिग्नल असेल तरच स्थानिक पातळीवर शाळा सुरु करण्याबद्दल चर्चा करावी. स्थानिक स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करणे गरजेचे आहे.
परंतु, कोणत्याही कोरोनामुक्त गावामध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी गावात किमान एक महिनाभर तरी एकही कोरोना बाधित रूग्ण आढळता कामा नये, हि महत्वाची अट असून, शिक्षकांचे लसीकरण गरजेचे आहे. एखादा विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कोरोना नसलेल्या गावांतून शाळा सुरू होऊ शकत असल्या तरी पालकांमध्ये मात्र अजून द्विधा मनस्थिती आहे. त्यामुळे अद्याप एकाही गावाने तसा ठराव शासनाकडे पाठविलेला नाही.