गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक चाकरमानी गावी येण्यासाठी तयारीत आहेत. शासनाने देखील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी, रेल्वे, एसटीच्या जादा गाड्यांची सुद्धा व्यवस्था केली आहे. परंतु, अनेकजण सामान अधिक असल्याने खाजगी वाहनाने सुद्धा प्रवास करतात परंतु, कोकणात येणाऱ्या महामार्गांची आणि अंतर्गत रस्त्यांची एवढी दुरवस्था झाली आहे आणि त्यामध्ये घाटमाथ्यातून येताना दरडीचे संकट कायम असल्याने प्रवास कसा करावा अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गेल्या जुलै महिन्यांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत आहे. दरडीच्या धोक्यामुळे काही दिवस घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी घाट बंद ठेवण्यात आला होता. आमदार शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी परशुराम घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची महत्वाची माहिती दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात परशुराम घाटात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्याने खबरदारी बाळगून घाटातील वाहतूक तात्काळ थांबवलेली. या शिवाय माथ्यावरील परशुरामच्या डोंगराला भेगा गेल्याने ५ जुलैपासून काही दिवस हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर १४ जुलैपासून वाहतुकीला होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केवळ अटी शर्तींवर अवजड वाहनांच्या एकेरी मार्गासाठी हा घाट सुरू करण्यात आला तर सायंकाळी ७ नंतर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार निकम म्हणाले,मध्यंतरी पाऊस कमी झाला असतानाच घाट सुरू करण्याबाबत निर्णय होणार होता; मात्र त्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देऊन कोकणात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला. आणि त्या काळामध्ये जोरदार पाऊस देखील कोसळला. त्यामुळे घाट सुरू करण्याबाबतचा निर्णय काहीसा लांबणीवर पडला. मात्र, आता गणेशोत्सवासाठी काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिले असल्याने, या संदर्भात आम. निकमांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले. पावसाचा अंदाज घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे गणेशोत्सव काळात घाटातील वाहतूक सुकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.