दोन महिन्यांपूर्वी शहरातील गॅस पाईपलाईनच्या खोदाईस सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेसह सर्वपक्षियांनी आंदोलन करीत खोदाईचे काम बंद पाडले होते. खोदाई झालेल्या ठिकाणी डांबरीकरणाने पॅचवर्कसाठी निविदा निघत नाही, तोवर काम सुरू न करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. त्यानुसार पालिकेने पॅचवर्कबाबत निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्यामुळे सर्वपक्षियांनी केलेल्या आंदोलनास यश आले आहे. शहरात घरोघरी घरगुती वापराचा गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीने रस्ते खोदाई नंतरच्या पॅचवर्कसाठी पालिकेकडे ७५ लाख रुपये एप्रिल २०२३ मध्ये जमा केले होते.
तरीही पालिकेने या कामाची निविदा प्रक्रिया केली नव्हती. शहरातील शिवाजीनगर बसस्थानक ते जिप्सी कॉर्नर व्हाया अभिषेक हॉटेल गल्ली ते बहादूरशेख नाका या भागात भविष्यातील रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. तरीही खासगी कंपनीच्या गॅस लाईनसाठी पालिकेने रस्ता खोदण्याची मान्यता दिली. त्यामुळे ही परवानगी देणे म्हणजे भविष्यात रस्ता रुंदीकरण न होण्यासारखे असल्याचा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी घेतला होता. जिप्सी कॉर्नर ते बहादूरशेख नाका या भागात तसेच अन्य उपनगरांतील गल्ल्या या रुंदीकरणात आहेत.
सध्याच्या स्थितीला सांस्कृतिक केंद्र ते बहादूरशेख नाका या भागातून जाताना प्रवासी किंवा शहरवासियांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्व वाहतूक कराड रोड, काविळतली भागातून होत आहे. प्रकाश पवार, अमित कदम, विक्रांत पवार यांना ही पॅचवर्क कामे मिळाली आहेत. त्यांना निविदा स्वीकारण्यासाठी रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आंदोलनात हजर होते. शिवसेनेने केलेले हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला.