रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणाची ६२ कोटी थकबाकी आहे. महावितरण कंपनीच्या वीज बिल थकबाकीने कंपनीची चिंता अजूनच वाढवली आहे. मागील दोन वर्षापासून कोकणाला नैसर्गिक आपत्तीने झोडपून काढल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले असून, आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे यापुढे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ००४ ग्राहकांनी आपली पूर्ण वीज बिले भरलेली नाहीत. यामध्ये रत्नागिरी विभागातील ८९ हजार २९५ वीज ग्राहाकांकडे २७ कोटी ६२ लाख, खेड विभागातील ४३ हजार ४६७ ग्राहकांकडे १४ कोटी ३६ लाख, चिपळूण विभागात ४३ हजार २४२ वीज ग्राहाकांकडे १५ कोटी३८ लाख एवढी रक्कम थकीत आहे. अखेर थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिला आहे.
कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष मिटर रीडिंग घेऊन बिल देण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. पण त्यासाठी सुद्धा महावितरण कंपनीने वीज बील अचूक मिळण्यासाठी एसएमएस, मोबाईल ऍप तसेच वेबसाईट मार्फत मीटर रीडिंग अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. स्थानिक पातळीवर वीज बिलातील दुरुस्त्या तत्काळ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे एकही तक्रार प्रलंबित राहू नये, असेही आदेश सर्व उप विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
महावितरण कंपनीला सलग दोन वर्ष निसर्ग आणि तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे कंपनी डबघाईला आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वीजबिल भरण्यास दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे सध्या शक्य नाही. त्यामुळे अशा थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास आक्षेप घेणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिला आहे.