गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये विविध प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रम सुरु आहे. या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. मोदींचा उत्तर प्रदेश दौराही त्याचा एक भाग असल्याचं बोललं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेरठमधील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली. त्याआधी मोदी या विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जीममध्ये जाऊन मोदींनी संपूर्ण जीमबद्दल, विविध व्यायामाबद्द्ल माहिती घेतली. तिथं जे ट्रेनर होते, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यानंतर मोदींना देखील व्यायाम करण्याचा मोह आवरला नाही. मग काय? मोदींनी बॉडी वेट लॅटपुल मशीनवर बसत थेट १५ चा एक सेट मारला!
बॉडी वेट लॅटपुल मशीनवर व्यायाम करुन शरीराच्या स्नायूंना मजबुती मिळते. खासकरुन खांद्यांना बळकटी यावी, यासाठी या मशीनचा वापर केला जातो. नियमित व्यायामशाळेत जाणाऱ्यांना या मशीनबद्दल विशेष सांगायची गरज पडत नाही. पण मोदींनी थेट या मशिनवर बसून व्यायम केला. सलग १५ वेळा मोदींनी हे मशिन ओढलं, याला जीमच्या भाषेत एक सेट मारला असे म्हणतात.
दरम्यान, मोदी अनेकदा आपल्या संबोधनात फिटनेस बद्दल जागरूक असलेले दिसतात. २९ ऑगस्ट २०१९ रोजी मोदींनी फिट इंडिया मिशनची देखील सुरुवात केली होती. आता स्वतः नव्या वर्षात एक्सरसाईज करताना मोदींचा व्हिडीओ समोर आल्यानं त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या उलट सुलट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. संबित पात्रा यांनी नरेंद्र मोदी यांच्या व्यायामाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. नवीन वर्षात मोदींनीही जीमचा संकल्प केला की का?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.