कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११ कोटी रुपये खर्च झाले. तरीही घाटरस्त्याची दुरवस्था आहे मग हा निधी गेला कुठे, असा सवाल मनसेच्या वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. निकृष्ट कामाप्रकरणी शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली नाही तर गाठ माझ्याशी आहे. मी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार, असा इशाराही त्यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला. महामार्गावर सती ते कुंभार्ली घाटरस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कुंभार्ली घाटासह सती खेर्डीपर्यंत रस्ता खड्ड्यांनी भरला गेला आहे.
या खड्ड्याची मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि कार्यकर्त्यांनी खड्याची पूजा करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने टाहो फोडला तर सोमवारी या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले, रिक्षा संघटनेचे दिलीप खेतले, सदानंद गोंधळी, सरफराज हमदुले, गजानन राक्षे, दीपक मोहिते, राकेश शेट्टे, मुराद हैसनी, निजाम सुर्वे, अकबर शिरलकर, नरेश कदम आदी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडकले. मिरजोळी येथील दुरवस्था झाली आहे. तेथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत लाखो रुपये रस्त्याची खर्च झाले तरीही रस्ता दुरुस्त होत नाही मग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदाराकडून कोणत्या पद्धतीने काम करून घेतात, असा प्रश्न निर्माण होतो असे खेतले यांनी सांगितले.
कामे दर्जेदार का झाली नाहीत ? – या वेळी रस्त्यावर ११ कोटी रुपये दोन वर्षात खर्च केलेत तर मग रस्त्याची अशी अवस्था का ? २०१७ पासून या रस्त्यावर ३७ कोटी रुपये खर्च केलेत. मग हा पैसा कुठे गेला? सतत या रस्त्यावर निधी खर्च होत असताना कामे दर्जेदार का झाली नाहीत? असा सवाल राजू खेतले यांनी विचारला.