तालुक्यातील कामथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना देण्यात आलेल्या व्हिटॅमिन गोळ्यांची पावडर होत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या संदर्भात तक्रारी वाढताच त्याची तातडीने दखल घेत रुग्णालय व्यवस्थापनाने त्या गोळ्यांचे वाटप बंद केले आहे. दरम्यान, या गोळ्यांच्या पॅकेट्सवर २०२५ पर्यंतची मुदत असतानाही पावडर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कामथे येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कायम रुग्णांची गर्दी असते. अगदी गरिबांपासून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णही येथील आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत. या रुग्णालयाला शासनाच्या आरोग्य विभागाकडून औषधांचा पुरवठा केला जातो. रुग्णालयातील औषध मागणी कामथे उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा आरोग्य विभागाकडे केली जाते. काही महिन्यांपूर्वी कामथे उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना दिल्या गेलेल्या गोळ्या खराब असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी त्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली होती.
तसाच प्रकार तीन ते चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णांना वाटप केलेल्या व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे पाकीट फोडताच त्यातून पावडर बाहेर पडत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. पाकिटातील गोळी अखंड असल्याचे दिसते; पण पाकीट फोडताच त्या गोळीची पावडर होते. या प्रकारामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळी खावी की नाही, गोळी खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर काही विपरित परिणाम तर होणार नाही ना, अशा शंका रुग्णांच्या मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.- यासंदर्भात काही रुग्णांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशीही संपर्क साधून त्याची माहित दिली आहे.