तालुक्यातील किंजळेतर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी आणि सुकिवली या पाच गावांतील जमीन ओलिताखाली आणून परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उद्देशाने यस्तावित असलेला न्यू मांडवे लघुपाटबंधारे योजनेचा प्रकल्प ४५ वर्षापासून रखडलेला आहे. त्यामुळे धरणावर प्रस्तावित असलेला दोन मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही आजतागायत केवळ कागदावरच आहे. धरण प्रकल्पाला १९८३ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. धरणाची उंची ४४५ मीटर असून, २०.४३३ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता आहे. या प्रकल्पामुळे एकूण पाच गावांतील १८७७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. सांडवा ९४ मीटर, तर उजवा कालवा २१ किमी इतका प्रस्तावित आहे. कालव्याच्या बहुतांश कामांचा मोठा भाग पूर्ण झाला असला तरी संपूर्ण प्रकल्पाचे काम रखडलेले आहे.
धरणासाठी ११३.४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठी २९५.३४ लाख रुपयांचे वाटपही झाले आहे. प्रकल्पग्रस्त ८४ कुटुंबांना मौजेतळे आणि मांडवे येथे प्लॉटचे वितरण करण्यात आले असून, पुनर्वसन ठिकाणी देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांपैकी बहुतांश सुविधा पूर्ण झाल्या आहेत. तरीदेखील प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्याची वाट अद्याप पाहावी लागत आहे. या रखडलेल्या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तथापि, अनेक बैठका आणि दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात कामाला वेग आलेला नाही.
प्रशासनाची ढिसाळ भूमिका – प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ग्रामस्थ आणि जलफाउंडेशन कोकण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी गेल्या चार वर्षांत अनेक आंदोलने केली असून, प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे येत्या २६ जानेवारी रोजी धरणाच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.

