रत्नागिरीतील शहरातील मांडवी चौपाटीवर असणाऱ्या अनेक गैरसोईंमुळे यावर्षी गणेशभक्तांनी गौरी-गणपती विसर्जन सोहळ्यासाठी रत्नागिरी नजिकच्या भाट्ये समुद्र किनाऱ्याला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. विशेषतः मांडवीमध्ये उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे तेथे अनेक गैरसोईंना सामोरे जावे लागत असल्याचे काही गणेशभक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रत्नागिरीतील मांडवी चौपाटी हे अनेकांसाठी आकर्षण आहे. ४ विरंगुळ्याचे क्षण साजरे करण्यासाठी अनेक लोकं दररोज सायंकाळी मांडवी समुद्रकिनारी येत असतात. फेरफटका मारत असतात. गणेश उत्सवात मांडवी चौपाटी अधिक बहरते.
रत्नागिरीतील गणेशभक्त मोठ्या संख्येने मांडवी समुद्रकिनारी बाप्पाचे मनोभावे विसर्जन करत असतात. यावर्षी मात्र मांडवी चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी तितकी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले नाही. अनेकांनी मांडवी समुद्रकिनाऱ्याऐवजी रत्नागिरीनजिकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याला विसर्जनासाठी अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले. अर्थात याचा अर्थ मांडवी समुद्रकिनारी भाविकांनी गर्दी केली नाही असा नव्हे, मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मांडवी चौपाटीवर गणेशमुर्तीचे विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी कमी होती हे निश्चित. भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर ६० ते ६५ टक्के गणेशमतीचे विसर्जन झाले. भाट्ये ग्रा. पं.ने गणेशभक्तांसाठी सुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या.
मांडवीमध्ये गणेशभक्तांची उपस्थिती रोडावण्याबाबत सर्वान प्रमुख कारण सांगितले जाते म्हणजे येथे जो बंधारा घातला आहे त्यामुळे गैरसोय होते आहे. भक्तांची वाहने कोठे उभी करायची असा प्रश्न उपस्थित होत असून वाहतुकीची कोंडी होताना दिसते आहे. रस्त्याचीदेखील दुरावस्था झाली आहे. अडचणींचा डोंगर आहे. आजुबाजूची गटारे प्रमाणापेक्षा अधिक उंच झाल्याने भाविकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या साऱ्यांचा परिणाम म्हणून यावर्षी गौरी- गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांनी मांडवी ऐवजी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला अधिक पसंती दिल्याची चर्चा सुरु आहे. मांडवी चौपाटी ही रत्नागिरीची शान आहे. तेथे असलेल्या गैरसोयी तत्काळ दूर कराव्यात, पालकमंत्री उदय सामंत यांनी जातीनिशी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.