मुंबई, पुण्याला नोकरीनिमित्ताने जाणारा लोंढा गावातच थांबविण्यासाठी कृषी शिवाय पर्याय नाही. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ताकद देणारा आणि सेंद्रिय शेतीसाठी पूरक असा १ हजार गायी वाटप कार्यक्रम राबविण्यासाठी तातडीने प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. बँकांनी नाहक त्रास देऊन कर्ज रोखण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र व राज्य पुरस्कृत विविध शासकीय योजनांची आढावा बैठक दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ. स्वामीनाथन सभागृहात काल झाली.
या वेळी आमदार योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, कृषिभूषण नाथाराव कराड, संचालक डॉ. पराग हळदणकर, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने आदी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री सामंत म्हणाले, शेतीला त्रास देणाऱ्या रानटी प्राण्यांपासून संरक्षणासाठी डीपीसीमधून लागेल तेवढा निधी द्यायला आम्ही तयार आहोत.
शासनाच्या विविध योजनांसाठी बँकांनी कर्ज देताना लाभार्थ्यांना नाहक त्रास देऊ नये. कर्ज रोखण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलून गुन्हे दाखल केले जातील. विद्यापीठाच्या संशोधन विभागाने क्षेत्रीय स्तरावर घोंगडी बैठका घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे त्यासाठी कार्यशाळा आयोजित करावी. तालुक्यातील भात क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत.