हल्ली तरुण पिढी विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सक्रीय झालेले दिसतात. अनेक जण ढोल पथक, झांज पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऑर्डर घेऊन तिथे कार्यक्रमासाठी जातात. विशेष म्हणजे मुलगे मुली एकत्रित मिळून असे कार्यक्रम पार पाडतात.
अशाच प्रकारे पुणे येथून एक ग्रुप वादनासाठी हैदराबादमधील सिकंदाराबाद येथे गेला असता, गेलेल्या ढोल-ताशा पथकातील वादकांना वादनाची सुपारी देणाऱ्या हैदराबादमधील एका व्यक्तीकडूनच सिकंदाराबाद येथे डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाबरलेल्या त्यातील काही मुलांनी याबाबत मनसेच्या महिला शहराध्यक्षा ऍड. रूपाली पाटील आणि तेथील सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी यांच्याशी त्वरित संपर्क साधला.
त्यांनी तातडीनं सूत्रे हलवून हैदराबाद येथील परिचयातील राजकीय व्यक्तींशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने या सर्वांची सुटका करून घेतली आहे. ऍड. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठान ढोल ताशा पथक मागील आठवड्यामध्ये हैदराबाद येथील सिकंदराबादमध्ये वादनासाठी गेले होते. प्रेमचंद यादव नामक व्यक्तींकडून त्यांना या वादनाचे काम मिळाले असून, चार दिवसांच्या वादनासाठी अडीच लाख रुपये देण्याचे यादव यांनी कबूल केले होते. त्यानुसार, पथकाचे चार दिवसाचे म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंतचे वादनाचे काम पूर्ण झाल्यावर, त्यानंतर हा ग्रुप २३ तारखेला पुण्याकडे परत येण्यासाठी निघाला असता, यादव यांनी जबरदस्तीने या पथकास ठरलेल्या पैशामध्ये अजून दोन दिवस वादन करण्यास सांगितले आणि या पथकाच्या गाडीची कागदपत्रे काढून घेत त्यांना डांबून ठेवण्यात आले.
यादव यांच्या जादा दिवसांच्या मागणीला पथकातील सदस्यांनी वादन करण्यास नकार दिल्याने, त्यांच्यात वाद निर्माण झाले. या ६० जणांच्या पथकामध्ये १५ मुली होत्या. या घडलेल्या प्रकारणामुळे या मुलींना प्रचंड धक्का बसला असल्याचे ऍड. पाटील यांनी सांगितले. हे पथक सुटका होऊन शनिवारी रात्री पुण्याकडे यायला निघाले आहे.