कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन प्रकाराने अनेक गोष्टींची खरेदी करणे, त्यांचे पेमेंट सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करण्याची अनेकांना सवय लागली आहे. परंतु, अशा प्रकारचे पेमेंट करणे सुद्धा आर्थिक तोट्यात घालू शकते.
काही ठिकाणी पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित पेमेंट अदा करण्याचे प्रमाण सध्याच्या काळामध्ये अधिक प्रमाणात वाढलेले दिसून येते. कोरोनाच्या भीतीमुळे सध्या कोणीही रोख पैसे सोबत बाळगत नाहीत. अगदी लहानातील लहान पेमेंट सुद्धा क्यूआर कोड स्कॅन करून दिली जाते. पण यातील धोका लक्षात घेऊन त्याबाबत वेळीच सावध न झाल्यास खाते रिकामे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हॅकर अशा कामामध्ये तरबेज असतात. अगदी काही क्षणामध्ये तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. आपण जर सावध राहिला नाहीत आणि ज्या ठिकाणी पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला तर काही वेळेला बॅंकेतून सगळीच रक्कम गायब होऊ शकते. हॅकरस मुद्दामहून आर्थिक फसवणुकीसाठी असे विशेष क्यूआर कोड तयार करतात. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन पेमेंट करताना सावध राहूनच पेमेंट करावे.
काही वेळेला पैसे घेण्यासाठी सुद्धा क्यूआर कोड स्कॅन करण्याची विनंती केली जाते पण असे करू नका. तुम्हाला पैसै घ्यायचे असल्यास रोख घ्या किंवा इतर माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. कारण पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याची कधीच गरज भासत नाही. त्यामागे काहीतरी काळबेर दडलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या व्यक्तीला पेमेंट करणार आहोत, त्याच्याशी संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपण कोणत्या नावावर पेमेंट करत आहोत, त्याची माहिती समोर स्क्रीनवर दर्शवली जाते. त्याची खातरजमा करूनच मग पिनकोड टाकून पेमेंट करावे. जेणेकरून फसगत होण्यापासून वाचू शकतो.