एखाद्या रुग्णांच्या शरीराचे स्कॅनिंग केले जाते तशा प्रकारे शहरातील फायबर आणि मेटलच्या सात पुतळ्यांची रेडिओग्राफीद्वारे स्कॅनिंग करण्यात आले. यामध्ये पुतळ्याची काय झीज झाली आहे का?, कुठे पोकळी पडली आहे का? आदींचे स्कॅनिंग करण्यात आले. यामध्ये प्राथमिक स्तरावर काही पुतळ्यांमध्ये किरकोळ दोष आढळून आले आहे. लॅबमधील तपासणीनंतर कंपनी तसा अहवाल रत्नागिरी पालिकेला सादर करणार आहे. त्यानंतर त्या पुतळ्यांची दुरुस्ती होणार आहे. रत्नागिरी पालिकेच्या हद्दीतील पुतळ्यांची रेडिओग्राफी गेली चार दिवस सुरू आहे. ही प्रक्रिया करताना परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. त्यामुळे या पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना होती म्हणून सुरक्षिततेसाठी २ ते ५ डिसेंबर मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात आली होती.
मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, शामराव पेजे यांचा पुतळा, श्री विठ्ठलाचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, जिजामाता उद्यानामधील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून २ ते ५ डिसेंबरदरम्यान रेडिओग्राफी करण्यात आली. कॅलिबर काँक्रिट सोल्युशन्स या कंपनीच्या ६ जणांच्या टीमने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन पुतळ्यांमध्ये आढळलेले किरकोळ दोष काय ते लॅबमध्ये अधिक स्पष्ट होईल. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर शासनाने राज्यातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी शहरातील सात पुतळ्यांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरुस्ती करून पुन्हा पुतळा बसवण्यात आला.