दिवाळी संपली तरीही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. त्याचा फटका चिपळूण व संगमेश्वर तालुक्याला बसला आहे. बुधवारी रात्रभर पडलेल्या सरींमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत चिपळूण तालुक्यातील ३३ हेक्टर भातशेतीचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले असून, कापून ठेवलेली भातशेती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिपळूण तालुक्यात यावर्षी सुमारे ७ हजार २०० हेक्टरवरती भात लागवड करण्यात आली तर नाचणीची लागवड ५६८ हेक्टरवर झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने सुरुवात केल्याने भातलावणी रखडली होती; मात्र जूनला दमदार पाऊस झाल्याने रखडलेल्या लावण्या कशाबशा पूर्णत्वास गेल्या. त्यानंतर सातत्याने पावसाचा जोर कायम राहिला. अतिपावसामुळे सप्टेंबरमध्येच काही शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले होते.
त्यामुळे तालुका कृषी विभागाकडून सप्टेंबरमध्ये २२.४७ हेक्टरचे पंचनामे करण्यात आले. ऑक्टोबरमधील भातशेती नुकसानीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात सुमारे १० हेक्टरचे पंचनामे पूर्णत्वास गेले आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा काही शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. कृषी सहायक, मंडळ अधिकाऱ्यांसमवेत तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनीही भातशेती नुकसानीची पाहणी केली. तालुक्यात जवळपास ५० ते ६० टक्केहून अधिक भातकापणी पूर्ण झाली आहे.
उर्वरित भातशेती उभी आहे. शेतकरी भातकापणीच्या तयारीत आहेत; मात्र दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळत असल्याने भातकापणीला अडचणी येत आहेत, तरीही पावसाची उघडीप मिळताच शेतकरी भातकापणीवर जोर देत आहेत; मात्र परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाऊस पाठ सोडायला तयार नसल्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक मातीमोल झाले आहे. त्यात पावटा, कुळीथ, तूर या प्रमुख पिकांचेही नुकसान होत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके कुजून गेली आहेत. काढणी करून ठेवलेली शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. वायंगणी शेती पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे आता तरी पावसा थांब रे बाबा, बस झाले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

 
                                    