गणेशोत्सवनांतर वेध लागतात ते नवरात्रीचे. यावर्षीच्या नवरात्री उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ते म्हणजे कोरोनामुळे दीड वर्षानंतर उघडलेली भाविकांसाठी मंदिरे. दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात जरी नवरात्र साजरी करता येणार नसली तरी, शांततेत आणि कोरोना निर्बंधांचे पालन करून करता येणार आहे.
राजापूर तालुक्यात आडिवरे गावामध्ये पारंपरिक पध्दतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शक्तीपीठांपैकी एक असलेले आडिवरे येथील महाकालीचे देवस्थान. जागृत देवस्थान म्हणून सगळीकडे नावारूपाला आलेली हि आई महाकाली, भक्तांच्या अडीनडीला कोणत्याही रुपात धावून जाते. त्यामुळे तिच्यावर निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्तगणांची संख्या पूर्ण जगभर पसरली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या आडिवरे येथील महाकाली मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. महाकाली मंदिरामध्ये श्रीदेव नगरेश्वर, देवी महासरस्वती, देवी योगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ यांची देखील मंदिरे आहेत. श्री महाकालीची दक्षिणमुखी चतुर्भुज मूर्ती आहे. प्रत्येक मंदिराची विशेषता देखील वेगवेगळी आहेत.
या देवीची आख्यायिका पहायला गेले तर या देवीची मूर्ती, माश्याच्या जाळ्यांमध्ये सापडली होती. भंडारी समाजातील काही नौका मासेमारीला गेल्या असता, एकाच्या जाळ्यामध्ये हि मूर्ती मिळाली होती. त्यांनतर देवीने दृष्टांत देऊन माझी योग्य जागी स्थापना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे अनेक जागांचा शोध घेतल्यानंतर आडिवरे या गावामध्ये देवी स्थानापन्न झाली. पूर्वीच्या लहान मंदिरापासून ते आताचे भव्य दिव्य मंदिर डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. इथे आता भक्तनिवासाची सुद्धा सुविधा देवास्थानामार्फत करण्यात आली आहे.
नवरात्रीमध्ये उत्सवकाळात मंदिरात घटाची स्थापना केली जाते. त्यामध्ये प्रत्येक दिवशी फुलांच्या माळा बांधणे, नवरात्र उत्सवकाळात मंदिरात दररोज आरत्या, धूप आरत्या, प्रदक्षिणा यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने, साध्या पध्दतीने यंदाही नवरात्र उत्सव साजरा करावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव सावधगिरीने साजरा करावा लागत आहे.