रत्नागिरीतील आरे या ठिकाणी श्री देवी केळबाईचे जागृत देवस्थान आहे. खरे तर आई केळबाईचे मंदिर मयेम गाव बिचोलीम गोवा येथे आहे. मुळची गोव्यातील असणारी हि केळबाई मातेचे एक मंदिर रत्नागिरीतील आरे या गावी सुद्धा स्थित आहे.
श्री देवी केळबाई देवी या ७ बहिणी आणि एक भाऊ. गोव्यातील लाईराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, महाळसा, अजादीपा या सात देवी आणि त्यांच्या सोबत त्यांचा भाऊ खेतोबा. पौराणिक माहितीनुसार ही भावंडे घाट ओलांडून पुढे आल्यावर गोव्यात बिचोलीम येथे पोहोचली. पण तिथे आधीपासूनच शांतादुर्गेचे वास्तव्य असल्याने तिने त्यांना जवळच्या मायेम या ठिकाणी पाठवले. ही भावंडे तिथे जाऊन राहू लागली.
गोव्याच्या विविध भागांत आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी आणि दुष्ट प्रवृत्तींच्या नाश करण्यासाठी ही सर्व भावंडे गोव्याच्या विविध भागांमध्ये विखुरली गेलीत. आज देवी लाइराई शिरगावात, देवी महामाया मायेममध्ये, देवी मोरजाई मोरजीम, देवी केळबाई मुळगावात, देवी महाळसा मार्डोल आणि देवी मीराबाई हि मिलाग्रेस सायबिणीच्या रुपामध्ये म्हापसा येथे वास्तव्यास आहे आणि त्यांचा भाऊ देव खेतोबाचे मंदिर वायंगण भागामध्ये आहे.
वर्षांतील ठरावीक दिवशी या सर्व बहिणी एकमेकांना भेटायला येतात. आणि त्यांच्या या भेटीगाठी म्हणजेच गोव्यातील लोकांसाठी मोठे उत्सव असतात. त्याचा जत्रा, यात्रा, फेस्त, अशा विविध नावाने उल्लेख केला जातो. श्री देवी केळबाई मंदिरामध्ये सुद्धा पाडव्याच्या चार दिवस आधी अनेक कार्यक्रम असतात, मोठी जत्रा भरवली जाते. समस्त मयेकर बांधवांची हि कुलस्वामिनी आहे. या यात्रेसाठी प्रत्येक वर्षी अगदी परदेशातूनही मयेकर बांधव देवीच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. हा संपूर्ण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
नवरात्रीमध्ये अनेक महिला आई केळबाईची ओटी भरण्यासाठी गर्दी करतात. रत्नागिरीमधील या मंदिरामध्ये सुद्धा नवरात्री, शिमगा आणि विशेष करून जत्रेच्या वेळेला प्रचंड गर्दी असते. ज्या मयेकर बांधवांना गोव्यातील जत्रेला जाणे काही कारणाने शक्य होत नाही ती आवर्जून मात्र रत्नागिरीतील या मंदिरात दर्शनासाठी जातात. स्थानिक मिळून सर्व सण उत्साह अतिशय अदबीने आणि एकत्रितरीत्या साजरे करतात.