गेली दीड वर्षे उपपरिसरामार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहरातील प्रदूषणाचा अभ्यास रत्नागिरी सुरू आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाकडून देशभरातील शहरांमध्ये हवा प्रदूषणाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये करण्यात आलेली टाळेबंदी मार्च २०२१ आणि टाळेबंदीनंतर एप्रिल २०२१ आणि त्याच वर्षी दिवाळीत २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या अहवालाचा आढावा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासाठी मिरजोळे एमआयडीसी आणि शहरातील नगरपालिका परिसरात हवामान नोंदणी यंत्रणा बसवण्यात आलेली.
कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प झाला होता. सर्वत्र टाळेबंदी असल्याने, वाहनांची, कारखान्यांची दुषित हवेचे प्रमाण कमी झाल्याने त्या कालावधीमध्ये रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर, सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या कालावधीत रत्नागिरी शहर परिसरात नोंद झालेल्या मानकांमध्ये हवा प्रदूषणामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. फटाके वाजवण्याबरोबरच वाढलेली वाहतूक आणि शहरात सुरू असलेली रस्ते आणि पाईपलाईनच्या उत्खननाची कामे ही हवा दूषित होण्यास कारणीभूत ठरली आहेत.
ऑक्टोबर २०२१ मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील अनेक भागामध्ये वाहनांची गर्दी दिसून येत होती. याच कालावधीमध्ये गटार, पाणी पाईपलाईन आणि रस्त्याचे बांधकामही चालू होते. उत्खनन, ड्रिलिंग आणि वाहनांमुळे हवेत दूषित कणाचा फैलाव झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दिवाळीत फटाके जास्त प्रमाणात फोडल्यामुळे हवा दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याची नोंद आहे.
टाळेबंदीच्या काळात मानकानुसार वातावरणातील हवा शुद्ध असल्याचेच दिसून आले आहे. दोन्ही ठिकाणी घेतलेली मानके दर आठवड्याला प्रदूषण मंडळाला पाठवली जातात. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांचा व्यापक वापर कमी करणे किंवा वैयक्तिक मर्यादा ठेवणे, पर्यावरणपूरक फटाक्यांवर भर देणे अशा सूचनाही केल्या गेल्या होत्या. हे सर्व कामकाज प्रकल्पप्रमुख म्हणून डॉ. पांडुरंग पाटील, सहायक संशोधक डॉ. अजय गौड, क्षेत्र सहायक कैलास जाधव, प्रतिराज पाटील पाहत आहेत.