राज्यात विविध शहरांमध्ये महागाई आणि दिवसागणिक वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करून आंदोलने सुरु आहेत. रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यामध्ये चिपळूण शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये बहुत हुई महंगाई कि मार, अबकी बार बदलो सरकार, धिक्कार असो धिक्कार असो केंद्र सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या सरकार विरोधी घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. जर पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले नाहीत तर, कॉंग्रेस आता थेट रस्त्यावर उतरून निषेध नोंदवेल, अशा इशाराही लियाकत शहा यांनी दिला.
आज राज्यात मुंबई, पुणेसह अनेक ठिकाणी महागाई विरोधात आंदोलने केली गेली. एकतर कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मागील एक वर्षापासून उत्पन्नाचे साधनच काही उपलब्ध नसल्याने आर्थिक व्यवस्था पुर्णपणे ढासळली असताना दिवसागणिक वाढत जाणारी महागाईमध्ये मात्र सर्वसामान्य माणूस पोळला जात आहे. कसे जगावे जीवन आणि कसा चालवावा कुटुंबाचा उदरनिर्वाह!
चिपळूणसह रत्नागिरी मध्येही पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने निषेध आंदोलन केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड.विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरीतील काँग्रेस भवन कार्यालय येथे हे निषेध आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी मोदी सरकार हाय हाय, असल्या सरकारचे करायचे काय! खाली डोके वर पाय, अशा प्रकारच्या घोषणा देऊन राग आणि नाराजगी व्यक्त केली. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे अश्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसरामध्ये कॉंग्रेस अधिकारी आणि सदस्यांनी निषेध नोंदविला.