रत्नागिरी शहरामध्ये वाहनांची वर्दळ सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एसटीच्या सुरु असलेल्या संपामुळे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात २ चाकी आणि ४ चाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपघातांच्या घटना सुद्धा वाढत चालल्या आहेत. रस्त्यांची सुरु असलेली डागडुजीमुळे, नवीन केलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने आणि मुख्य म्हणजे वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने, अनेक अपघात घडतात.
रत्नागिरी शहरातील एमआयडीसी रेस्ट हाऊस समोर स्पीड ब्रेकरवर, रिक्षा टेम्पोने ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या बोलेरो पिकअपने रिक्षा टेम्पोला जोरदार धडक दिली. यात दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नितीन अशोक मोरे रा. पंधरामाड, मुरुगवाडा, रत्नागिरी हे आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पोत माल घेऊन आठवडा बाजार ते एमआयडीसीच्या दिशेने जात होते. येथील स्पीड ब्रेकरवर त्यांनी ब्रेक लावला असता पाठीमागून येणाऱ्या बोलेरो पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा टेम्पो चालक नितीन मोरे व सुशांत मालगुंडकर रा. मारुती मंदिर, रत्नागिरी हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर बोलेरो चालकाने घाबरून तिथून पळ काढला.
याबाबतची फिर्याद रिक्षा टेम्पो चालक नितीन मोरे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसानी बोलेरो पिकअप चालकाचा शोध घेऊन, दिलीप किशोर साह रा. पुणे याच्या विरोधात भादवी कलम २७९, ३३७, ३३८ मोटर वाहन कायदा कलमन्वये १८४,१३४ (ब) गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार टेमकर करत आहेत.