रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसच्या जागा अगदी बोटावर मोजण्या एवढ्याच शिल्लक असतील. त्यामुळे सध्या निवडणुकांचे बिगुल पुन्हा वाजू लागले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा कॉंग्रेसने पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहे.
काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशस्तरावरून जिल्हाध्यक्षपदी अविनाश लाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य निवड झाल्यानंतर उर्वरित पदांवरील नियुक्त्या करण्यासाठी सभासद नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बुथ तेथे काँग्रेसचे कार्यकर्ते अशी मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करून ती मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. त्याला नुकतीच प्रदेशस्तरावरून मंजुरीही आली आहे. यामध्ये जुन्या-नव्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे, खजिनदार दिलीप बोथले यांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे पदभार स्वीकारल्यानंतर बनवण्यात आलेली जिल्हा कमिटी मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील जुन्या-नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली जंबो कार्यकारिणीत ८० पेक्षा जास्त सभासदांचा समावेश आहे. कार्यकारिणीत नवीन कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी देण्यात आली असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. रत्नागिरीचे माजी नगरसेवक संजय उर्फ बाळा मयेकर यांना सरचिटणीसपदावर संधी दिली आहे.
उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जाधव यांना पुन्हा संधी देतानाच २१ जणांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाळा मयेकर, प्रसाद उपळेकर, सुरेश कातकर, संतोष शिर्के यांच्यासह २४ जणांची सरचिटणीस, तर ३० जणांची चिटणीस आणि सात सदस्य अशा नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रवक्तापदी चिपळूणचे इब्राहिम दलावाई यांना देखील संधी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.