कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रत्नागिरी बी.एन.पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, मा.उदयजी बने उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ.अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हावासियांना केल्या आहेत.
राज्यामध्ये दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांचे कोविड-१९ लसीकरण सुरु करण्याबाबत शासन स्तरावरुन सुचना देण्यात आलेल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड-१९ लसीकरण आठवड्यातून दोन वार म्हणजेच बुधवार व शनिवार या दोन दिवशी करण्यात येणार आहे. सदरच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर ६० वर्षे वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनांक १०जानेवारी २०२२ पासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाउंटवरूनच प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करावी लागणार आहे. ज्या लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे, त्याच लसीचा प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे, कोणताही कॉकटेल डोस देण्यात येणार नाही आहे.
त्याचप्रमाणे, दुसऱ्या डोसनंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्या लाभार्थीनाच प्रिकॉशन डोस पात्र ठरवून केवळ त्यांनाच प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. या कोविड-१९ लसीकरणाला नागरिकांनी उस्फुर्तपणे, कोणत्याही प्रकारची शंका –कुशंका मनात न ठेवता प्रतिसाद देण्याचे आवाहन मा.विक्रांत जाधव अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, लसिकरणासाठी नागरिकांनी गर्दीत करू नये, कोरोनाच्या सर्व निर्बंधांचे पालन करावे, सोशल डिस्टंसिंग ठेवावे, नियमीत मास्कचा वापर करुन योग्य वेळी सॅनिटायझरचा वापर करावा.