रत्नागिरी जिल्ह्यात ऐन सणाच्या तोंडावर अनेक सीएनजी पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. शिमग्याला अनेक चाकरमानी गावाला आले होते. आणि शिमग्याची सांगता झाल्यावर सर्वजण आपापल्या घरी परतले सुद्धा आहेत. परंतु, ऐन सणाच्या हंगामात इंधनाचे दर वाढलेले आणि त्यामध्ये सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा चालाकांपासून ते खाजगी वाहनापर्यंत सर्वांचेच खूप हाल झाले.
जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील शहरी भागामध्ये सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षाचालक अडचणीत सापडले आहेत. चार ते पाच तासांपेक्षा जास्त वेळ रांगेमध्ये रिक्षा लावाव्या लागत असल्याने, मग उरलेल्या दिवसात व्यवसाय कसा करायचा ? कि दिवसभर रांगेतच उभे राहायचे? असा संतप्त सवाल उपस्थित रिक्षाचालकांनी यावेळी व्यक्त केला.
लांज्यामध्ये हा सीएनजीचा एकमेव पंप आहे. मात्र बर्याच वेळेला सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांसह चारचाकी वाहन चालकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. पेट्रोलच्या तुलनेने सीएनजीचा दर कमी असल्याने, जुनी वाहने विकून सीएनजीवर चालणार्या नवीन रिक्षा खरेदी केल्या. यातील बहुतेक रिक्षा चालकांनी बँकेकडून कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या आहेत. रांगेत उभे राहून धंदे न करता कर्ज फेडायचे तरी कसे ? असा संतप्त सवाल रिक्षा चालकांनी व्यक्त केला.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी भरून गेला होता. मात्र मोठ्या प्रमाणावर मुंबई पुण्याहून वाहने आल्याने खेडमध्ये सीएनजीचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. मुंबई-गोवा महामार्गावरील आपडे फाटा येथे असणार्या सीएनजी पंपाच्या बाहेर अर्धा किलोमीटरपेक्षा लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे तीन ते चार तास वाहने रखडत आहेत, त्यामुळे महामार्गावर इतर वाहनांना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.