जिल्ह्यात कोरोना काळ आणि नैसर्गिक आपत्तींमुळे प्रमुख मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला असून, ती स्थिती वातावरणाच्या लहरीपणामुळे अद्याप देखील तशीच आहे. कधी अति पाऊस तर कधी वादळजन्य परिस्थिती त्यामुळे मच्छिमाऱ्यांनी नौका समुद्रात नेण्यास असमर्थता दर्शवली आहे. वातावरणामध्ये होत असलेल्या सततच्या बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे वार्षिक उत्पन्न देखील कमी झाल्याने, मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
कोकणातील प्रमुख व्यवसायामध्ये मासेमारी येत असून, रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कुटुंब मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू झाल्यापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. समुद्रात देखील वाऱ्यांची दिशा, स्थिती आणि अचानक उद्धभवणारी वादळे त्यामुळे मच्छीमाऱ्यांचे आर्थिक समीकरण बिघडलेच आहे.
ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारी पाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू आहे. मात्र, मासे खोल समुद्रात गेल्याने, मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय सध्या या व्यवसायामध्ये उत्पन्नच मिळत नसल्याने, खलाशांचाही खर्चाचा प्रश्न निर्माण होत आहे. मासेमारी सुरू झाल्यानंतर एका पाठोपाठ नैसर्गिक आपत्तीची स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश वेळा मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात येतात.
तसेच खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.