सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने खरे असल्याचे भासवून, त्याची कमी पैशात विक्री करून देवरुख येथील महिलेची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक करणार्या टोळीच्या शहर पोलिसांनी शनिवारी रात्री मुसक्या आवळल्या. रविवारी न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच यातील दोन महिलांना रविवारी दि.१० जुलै सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे गंगाराम बघेल, हरीभाई वाघडी, लक्ष्मणभाई लालजी भाई वाघेले, गिताबेन वाघेले आणि शांती चव्हाण सर्व मुळ रा. अहमदाबाद,गुजरात सध्या रा.मिरजोळे पाडावेवाडी,रत्नागिरी अशी आहेत. एका ठिकाणी फसवणूक केल्यानंतर ते प्रकरण शांत होईपर्यंत ते आपल्या गावी जात असून, पुन्हा ३ ते ४ महिन्यांनी दुसऱ्या ठिकाणी फसवणुकीसाठी बाहेर पडत असल्याचे त्यांनी पोलिस तपासात सांगितले.
प्रथम या टोळक्याने देवरुख येथील महिलेची एप्रिल २०२२ मध्ये फसवणूक केली होती. या महिलेच्या दुकानात जाऊन संशयितांनी सोन्याची माळ आणि चेन दाखवून ते कमी किंमतीत विकायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर संशयितांनी महिलेला व तिच्या पतीला १ किलो सोन्याचे दागिने १० लाख रुपयांत देण्यासाठी माळनाका येथील ब्रीजखाली बोलावून हा व्यवहार करण्यात आला होता.
दरम्यान, कालांतराने ते दागिने केवळ सोन्याचा मुलामा दिलेले असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शहर पोलिसांनी देखील हा विषय गांभीर्याने घेऊन शहरातील सर्व सोनारांकडे याबाबत माहिती देऊन, अशाप्रकारे जर कोणी सोन्याची तपासणी करण्यास आले तर प्रथम पोलिसांना माहिती देण्याबाबत आवाहन केले.
दरम्यान गेल्या आठवड्यात खेडेकर ज्वेलर्समध्ये अशा प्रकारे काही महिला सोन्याची तपासणी करण्यासाठी आल्या असल्याची माहिती खेडेकर यांनी पोलिसांना दिली. खेडेकर आणि पोलिसांनी त्या महिलांना तुमची फसवणूक होण्याची शक्यता असून संशयित तुम्हाला व्यवहार करण्यासाठी जेव्हा आणि जिथे बोलावतील तेव्हा भेटण्याच्या आधी पोलिसांना त्याची माहिती द्या. त्यानुसार एका महिलेने शनिवारी ते संशयित मारुती मंदिर येथे येणार असल्याचे त्यातील पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून, मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे. त्यांची सखोल चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला.