कोकणामध्ये आंब्याचा मोसम आत्ता सुरु झाला असून, आत्ताशा काही पेट्यांच्या उलाढाली सुरु झाल्या आहेत. मागील दोन वर्ष कोरोनामुळे आंब्याची उलाढाल मागणी असून सुद्धा पूर्ण करता येत नव्हती. परंतु यावर्षी बाहेरगावी अथवा दुसर्या राज्यात आंबा पाठ्विण्यासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत.
वाशी, गुजरात, अहमदाबादसह महत्त्वाच्या बाजारपेठांमधील दरानूसार रत्नागिरीतील केंद्रांवर स्थानिक बागायतदारांकडून हापूस खरेदी करण्याबाबत इनोटेरा कंपनी आणि स्थानिक बागायतदारांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. जागेवर खरेदी आणि रोखीतील व्यवहार या बोलीवर आंबा देण्यास स्थानिक बागायतदारांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे रत्नागिरीत येत्या १० मार्चपासून इनोटेरा कंपनीकडून आंब्यांची खरेदीला सुरुवात होणार आहे.
रत्नागिरीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. विविध देशांमधील निर्यातीबरोबरच हापूसची चव देशाच्या कानाकोपर्यात पोचवण्यासाठी इनोटेरा कंपनीकडून यंदाच्या हंगामात पुढाकार घेतला आहे. स्थानिक बागायतदारांबरोबर गेले काही दिवस सकारात्मक चर्चा झाली होती.
फळाच्या दराबाबत एक दिवस आधी सुचना देण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकर्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही यावेळी दर्शवली आहे. मात्र कमी पेट्या असल्या तर बागायतदाराला केंद्रापर्यंत तो आणून द्यावा लागणार आहे. याप्रसंगी बागायतदारांनी देखील आंबा पोच करण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच फळाच्या दर्जाप्रमाणे दर ठरवून, जागेवर पैसे देण्याची सुचना करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनी विचार करुन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेमार्फत यावर्षीपासून इनोटेरा या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने आंबा मार्केटींग करण्याचे ठरविले आहे. गेली १५ वर्षे ही कंपनी अॅग्रीकल्चर, फ्रुट व्यवसायामध्ये सक्रीय असून, यावर्षी प्रथम आंबा मार्केटींगमध्ये उतरणार आहे. आंब्याचे मार्केटींग विशेषतः ज्या आंब्याचे जीआय नोंदणी झालेली आहे त्यांना चांगला दर मिळावा व देशात-परदेशात आंबा जावा या हेतूने कंपनीने सहकार्य करण्याचे ठरविले आहे, अशी देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड.अजित गोगटे यांनी माहिती दिली.