रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील शेती आणि सखल भागातील अनेक ठिकाणाला बसला आहे. दहा पंधरा दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अचानक दमदार कोसळायला लागल्याने, शेतामध्ये देखील पाणी भरले आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून, त्यापुढे तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८३.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यांमध्ये १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण मध्ये देखील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे गुहागरमधील शृंगारतळी येथे पावसामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक दुकानात पाणी शिरलेले. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने या ठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तर रत्नागिरी तालुक्यांतील भंडारपुळे येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता प्रशासनाने तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवला होता. अनेक ठिकाणी नदी लगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असून प्रशासनाने जनतेला सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे.
शनिवार दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. काही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना काळोखात राहावे लागले आहे.