सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील क्रायो गॅस या कंपनीतून तयार होणारे ऑक्सिजन रूग्णालयांना पुरवण्यात येत आहेत. लोटे परिसरातील तीन मित्रांनी सुरू केलेला हा प्रकल्प जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी खर्या अर्थाने लाइफ सेवर ठरत आहे. विविध प्रकारच्या कारखान्यांमध्ये भट्टी चालवण्यासाठी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगाची गरज ओळखून आवाशी येथील सतीश आंब्रे, शेल्डी येथील सचिन आंब्रे आणि लोटेतील सचिन चाळके या तिघा तरूणांनी जानेवारी 2020 पासून लोटे एमआयडीसीमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारा क्रायो गॅस हा प्रकल्प उभारला. यापूर्वी हे तिनही तरूण लोटेतील एका कंपनीमध्ये कामाला होते. रत्नागिरीमधील उद्योजक वर्गाची गरज लक्षात घेऊन त्यांनी कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन, काही प्रमाणात स्वत: गुंतवणूक करून आणि काही आर्थिक मदतीसाठी बँकेचे कर्जचे नियोजन करून लोटे एमआयडीसीत तीन कोटीचा गॅस निर्मिती प्रकल्प त्यांनी सुरू केला.
लोटे एमआयडीसीतील बरेचशे कारखानदार आणि जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. शासकीय रूग्णालयामध्ये सुरुवातीला अगदी कमी प्रामाणात ऑक्सिजन पुरवठा करावा लागत असे. त्यामुळे विविध उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकडे कंपनीने भर दिला होता. मात्र कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर शासकीय रूग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. त्यानंतर या कंपनीने उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम बंद करून जास्तीत जास्त पुरवठा हॉस्पिटल्सना करण्यावर दिला.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी दिवसा दहा टन ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. पूर्वीच्या कंपनीने ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारे लिक्वीड बंद केल्यामुळे मध्यंतरी या कंपनीतून ऑक्सिजनचे उत्पादन फार कमी प्रमाणात होऊ लागले होते. मात्र जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी जिंदाल कंपनीकडून लिक्वीड उपलब्ध करून दिल्यामुळे क्रायो गॅस कंपनीतून आता दिवसालाकिमान 8 ते 10 टन ऑक्सिजन निर्मितीचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांना, जसे कि रत्नागिरी येथील ग्रामीण रूग्णालय, चिपळूणातील कामथे उपजिल्हा रूग्णालय, खेड येथील कळंबणी उपजिल्हा रूग्णालय, दापोली, गुहागरसह या कंपनी मधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
सतीश आंब्रे यांनी या प्रकल्पा बदल सांगितलं कि, खर तर कारखानदारांची गरज लक्षात घेऊन आम्ही क्रायोगॅस ही ऑक्सिजन निर्मिती करणारी कंपनी सुरू केलेली. परंतु, कोरोनाचे एवढे महाकाय रूप बघायला मिळेल आणि आमच्या कंपनीतील ऑक्सिजनचावापर जिल्ह्यातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केला जाईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. कोविडचे लसीकरण सर्वत्र सुरु आहे, परंतु लस घेऊन आल्यावर सुद्धा विश्रांती घेता आलेली नाही. आम्ही स्वतः ऑक्सिजनचे छोटे मोठे टँक भरून जिल्ह्यात पाठवण्याचे काम तिघे करत आहोत, जेणेकरून वेळेवर ऑक्सिजन पुरवठा होऊन लोकांचे प्राण वाचतील.