रत्नागिरीमध्ये अंमली पदार्थ तस्करी, बेकायदेशीर खरेदी आणि विक्रीची प्रकरणे जास्तच डोके वर काढायला लागली आहेत. पोलिसांनी मंगळवारी पहाटे शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका लॉजवर छापा टाकला. या कारवाईत दोन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून काही प्रमाणात अमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. घटनास्थळी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी पंचनामा करण्याची कारवाई सुरू करण्यात आला आहे.
मंगळवारी पहाटे शहर पोलिसांचे गस्ती पथक रहाटाघर ते मांडवी जाणार्या रस्त्यावर गस्त घालत असताना त्याठिकाणी हे दोघे पोलिसांना संशयितरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांची उडवीउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण दिल्ली ते केरळ जाणार असे जात असताना सोमवारी सायंकाळी रत्नागिरीत आल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस भुवन येथील निलराज लॉजमध्ये थांबल्याचेही सांगितले.
रत्नागिरी शहरातील काँग्रेस भुवन येथील लॉजवर शहर पोलिस व डिबी पथकाने छापा टाकून सुमारे ४ लाख ९५ हजार रुपयांचा ९९ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई मंगळवार १ मार्च रोजी पहाटे ४.४५ वा. करण्यात आली असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शियाद ए.के वय २५ आणि नजब मोईद नौफर वय २५ ,दोन्ही रा.केरळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नक्की कुठे आणि कोणासाठी एवढ्या अंमली पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी हा माल आणला गेला आहे याची पोलीस चौकशी करत आहेत.