कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव रत्नागिरी रेल्वेस्टेशनला देण्यात यावे, या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांबाबतचे निवेदन प्रा. मधु दंडवते स्मारक समितीच्यावतीने कोकण रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन यांना सादर करण्यात आले. मागण्यांबाबत २६ जानेवारी २०२४ पर्यंत अंमलबजावणी न केल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वेस्थानक या ठिकाणी लाक्षणिक धरणे उपोषण, आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन आडवली रेल्वेस्टेशन यांच्यामार्फत कोकण रेल्वेचे चेअरमन यांना सादर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, प्राध्यापक मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांचे कोकण रेल्वे निर्माण कार्यात मोठे ऋण आहे आणि म्हणूनच रत्नागिरी रेल्वेस्थानकाला प्रा. मधु दंडवते असे नाव देण्यात यावे. कोकण रेल्वेचे रत्नागिरी स्थानक येथे प्राध्यापक मधु दंडवत यांचे तैलचित्र प्रवेशद्वार या ठिकाणी असलेल्या प्रवासी बैठक व्यवस्था त्या जागी भिंतीवर लावण्यात यावे.
रत्नागिरी रेल्वेस्थानक ते महामार्ग रस्त्याला प्रा. मधु दंडवते मार्ग असे नाव देण्यात यावे, सावंतवाडी रेल्वेस्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करून कार्यान्वित करावे आणि प्रा. मधु दंडवते यांचे नावे रेल्वे सुरू करावी किंवा विद्यमान रेल्वेगाडीचे नामांतर करावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या वेळी प्रा. मधु दंडवते स्मारक समितीचे चंद्रकांत परवडी, सुनील मानकर, राजेश लांजेकर, नंदकुमार आंबेकर आदी उपस्थित होते.