जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदारपणे पावसाची हजेरी लागली होती. आठवडाभर रत्नागिरी जिल्ह्याची जोरदार झोडपणी करून, अचानक पाऊस पडायचा बंदच झाला. सगळीकडे स्वच्छ सूर्याचा प्रकाश पडत होता, उन्ह एवढ्या प्रमाणात पडले होते कि, अंगाची लाही लाही होत होती. शेतकऱ्यांची बियाणी पेरून रोप लावणीसाठी तयार होती, परंतु, पावसाने अचानक मारलेल्या दडीमुळे शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. पावसाच्या लपंडावामुळे रोपे वळून जातायत कि काय अशी चिंता बळीराजाला सतावू लागलेली.
पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यापूर्वीच शनिवारी रात्री दमदार आगमन केले. रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे गारठा प्रचंड वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये साधारण सरासरी ३४२ मि.मी. पाऊस पडला. तसेच १२ जुलै पासून पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे या शहरांसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा मारा होणार आहे. म्हणून हवामानशास्त्र विभागाने सोमवारी रत्नागिरीमध्ये रेड अलर्टसह शहराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून दमदार एन्ट्री केलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असून, अनेक ठिकाणी नद्या पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. राजापूर शहर परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत सकाळपासून नदीचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरू लागल्याने एकच तारांबळ उडालेली दिसली. राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे हे प्रत्यक्ष फिरून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अर्जुना नदी पातळी ओलांडून वाहू लागल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई सह अन्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा सलग ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.