रत्नागिरी जिल्हयाला नैसर्गिकत: लाभलेले सौंदर्य म्हणजे दैवी वरदानच आहे. हिरव्यागार डोंगर रांगा, स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, त्याच्या आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदय अजूनच पर्यटकांना आकर्षित करत असते. कोकणामध्ये पर्यटकांचा ओघ कायमच अधिक असतो. त्याचप्रमाणे अनेक ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावातच राहण्याची आणि घरगुती जेवणाची सोय केली जात असल्याने, पर्यटक सुद्धा ग्रामीण भागातील जीवनमानाचा अनुभव घेऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या परिपक्व बनविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अनेक पर्यटन स्थळी काही पायाभूत सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने, पर्यटक काहीशा प्रमाणात नाराज होतात. त्यामुळे अशा पर्यटनस्थळांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील चार ठिकाणांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाने २७० कोटी ४८ लाख १२ हजार एवढ्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यापैकी ८९ कोटी ४९ लक्ष १९ हजार एवढा निधी राज्यातील संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरित केला आहे. यापैकी रत्नागिरीसाठी मंजूर झालेल्या ५ कोटींपैकी १ कोटी ५ लाखांचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
या निधीतून रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस, रत्नदुर्ग किल्ला, भाट्ये समुद्रकिनारा आणि आरे-वारे समुद्रकिनारा या चार ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जेणेकरून पर्यटन व्यवसायाला चांगल्या प्रकारे उभारी मिळेल आणि जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरी भ्रमंतीसाठी येतील.