काही वेळा आर्थिक दृष्ट्या अडचणीमुळे कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु, एकतर कर्जाची चिंता आणि त्यात सर्व बँकांचा चढा दर त्यामुळे, नक्क्की कोणत्या बँकेतून कर्ज घ्यावं! याबद्दल अनेक विचारांनी डोक भंडावून सोडत. सध्या अगदी कमी कागदपत्रांमध्ये आणि कोणत्याही झिगझिग शिवाय झटपट कर्ज मिळावं यासाठी डिजिटल अॅपचा वापर करणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु त्यानंतर आपली होणारी फसवणूक आणि वसुलीचा तगादा लावला जातो. यापासून सावध राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना डिजिटल मनी लेंडिंग अॅप्सबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि डिजिटल कर्ज देणारी इकोसिस्टम सुरक्षित करण्यासाठी आणि नाविन्य पूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक अहवाल तयार केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या अहवालात असे म्हटले आहे की, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या कर्जाच्या व्यवसायामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत आहे. डिजिटल कर्ज देणाऱ्या इको सिस्टमवर धोका वाढत आहे. अनेक अॅप विविध प्रकारामध्ये स्वस्त कर्ज देत आहेत, पण अशा प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील अशा अॅप्सबद्दल ग्राहकांना कायम वेळोवेळी सतर्क केले आहे. प्रत्यक्षात हे संपूर्ण रॅकेट आहे, ज्यामध्ये चीन, इंडोनेशियाचे नागरिक आहेत, ज्यांना कर्ज देण्याचा अधिकार नाही. असे असतानाही ते काही मिनिटांतच कर्जाचे आमिष दाखवून लोकांना फसवत आहेत. अशा अॅप्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या विविध आकर्षक व्याजदर, काही सेकंदातच कर्ज देण्याचे गोड बोलून आश्वासन देतात. त्यानंतर मात्र कर्ज घेतल्यावर जबरदस्तीने थकबाकी वसूल करण्यासाठी पाठी तगादा लावतात.